गोवा- कळंगुट येथे अमली पदार्थाची विक्री करताना एकाला रंगेहाथ अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 09:15 PM2017-10-16T21:15:15+5:302017-10-16T21:15:33+5:30
अमली पदार्थाविरोधात कळंगुट पोलिसांनी सुरू केलेली धडक मोहीम सुरुच ठेवली आहे. सोमवारी कळंगुट पोलिसांनी ओडिसा राज्यातील एका इसमाला गांजा या अमली पदार्थाची विक्री करताना रंगेहाथ पकडले आहे.
म्हापसा : अमली पदार्थाविरोधात कळंगुट पोलिसांनी सुरू केलेली धडक मोहीम सुरुच ठेवली आहे. सोमवारी कळंगुट पोलिसांनी ओडिसा राज्यातील एका इसमाला गांजा या अमली पदार्थाची विक्री करताना रंगेहाथ पकडले आहे. त्याच्याकडून २४ हजार रुपये किंमतीचा चरस ताब्यात घेण्यात आला.
निरिक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे ४ वा. सुमाराला ही कारवाई करण्यात आली. मूळ ओरिसातील सूदर्शन डियो (३५) हा इसम कळंगुट येथील किनाºयावर अमली पदार्थाची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली. उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारावर त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करुन सापळा रचण्यात आला. रचलेल्या सापळ्यात तो अलगदपणे सापडला.
त्याच्याकडून २४० ग्रॅमचा चरस ताब्यात घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत २४ हजार रुपये होत आहे. त्याला अटक करुन अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला. अटक करुन रिमांडसाठी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
पर्यटन हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतिने अमली पदार्था विरोधात सुरू करण्यात आलेली मोहीम आणखीन कडक करण्यात येणार असल्याचे निरीक्षक जिवबा दळवी म्हणाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश नाईक, हवालदार दिनेश मोरजकर, गोविंद शिरोडकर तसेच इतर पोलिसांनी या कारवाईत भाग घेतला. पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.