स्लॅब कोसळून एक जागीच ठार तर दोन गंभीर जखमी
By पंकज शेट्ये | Published: September 7, 2023 05:32 PM2023-09-07T17:32:11+5:302023-09-07T17:32:19+5:30
वरुणापूरी, वास्को येथील नौदलाच्या वसाहतीत घडली घटना
वास्को: भारतीय नौदलाच्या वरुणापूरी, वास्को येथील ‘नेवल टेक्नीकल युनिट’ मधील एका जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून तेथे कामाला असलेला एक कामगार जागीच ठार झाला तर दोघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. स्लॅब कोसळल्याने जागीच ठार झालेल्या कामगाराचे नाव खेमकांत नारायण नाईक (वय ५०) असे असून तो मडकई येथील रहीवाशी आहे. स्लॅब कोसळल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या साई महाले (काणकोण) आणि बाबासाहेब सांगले ह्या दोन्ही कामगारांना बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
वास्को पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार गुरूवारी (दि.७) सकाळी १०.३० च्या सुमारास ती घटना घडली. वरुणापूरी, वास्को येथे असलेल्या नौदल वसाहतीतील नेवल टेक्नीकल युनीटमधील एका जुन्या इमारतीचा स्लॅब अचानक खाली कोसळला. ज्यावेळी तो स्लॅब कोसळला तेव्हा तेथे ‘नेवल सीवीलीयन एंप्लोई’ चे काही कामगार काम करत होते अशी माहीती प्राप्त झाली. त्या स्लॅबचा काही मोठा भाग खेमकांत नाईक याच्यावर कोसळल्याने तो जागीच ठार झाल्याची माहीती पोलीसांकडून प्राप्त झाली. तसेच स्लॅबचा काही भाग साई महाले याच्यावर कोसळल्याने त्याच्या दोन्ही पायांना गंभीर जखमा झाल्या तर बाबासाहेब सांगले याच्या डोक्याला स्लॅब कोसळल्याने गंभीर जखमा झाल्याची माहीती प्राप्त झाली. स्लॅब कोसळून त्यात तिघेजण गंभीररित्या जखमी झाल्याचे तेथे असलेल्या नौदल कर्मचाऱ्यांना दिसून येताच त्यांनी तिघांनाही त्वरित उपचारासाठी नौदलाच्या जिवंती इस्पितळात नेले. मात्र इस्पितळात आणण्यापूर्वीच खेमकांत नाईक याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याघटनेत जखमी झालेल्या साई आणि बाबासाहेब यांना नंतर पुढच्या उपचारासाठी बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात पाठवण्यात आले.
घटनेची माहीती वास्को पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा केला. तसेच स्लॅब कोसळून मरण पोचलेल्या खेमकांत नाईक याचा मृतदेह मडगावच्या हॉस्पीसीयो इस्पितळाच्या शवगृहात पाठवल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहन नागेशकर अधिक तपास करित आहेत.