वास्कोतील तरुणाचा बायणा समुद्रात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 09:15 PM2019-12-05T21:15:38+5:302019-12-05T21:16:54+5:30
वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार गुरूवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास सदर घटना घडली.
वास्को: दक्षीण गोव्यातील सासमोळे बायणा, वास्को भागात राहणारा मुरगन स्वामी हा ३८ वर्षीय तरुण बायणा समुद्रात गुरूवारी (दि.५) संध्याकाळी आंघोळीसाठी गेला असता येथे त्याचा बुडून मृत्यू झाला. समुद्रात बुडून मरण पोचलेला मुरगन स्वामी हा मुरगाव नगरपालिकेचा नगरसेवक धनपाल स्वामी यांचा भाऊ होता अशी माहीती वास्को पोलीस सूत्रांनी दिली.
वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार गुरूवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास सदर घटना घडली. मुरगन हा वास्को भागात राहणारा तरुण बायणा समुद्रात आंघोळीसाठी गेल्यानंतर तो बुडत असल्याचे ‘दृष्टी’ च्या जीवरक्षकांच्या नजरेस आले. जीवरक्षकांनी त्याला त्वरित समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढून नंतर चिखली उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेला, मात्र येथे पोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. पोलीसांनी मुरगन स्वामी याच्या मृतदेहाचा पंचनामा करून नंतर तो मडगाव येथील इस्पितळाच्या शवगृहात पाठवून दिला आहे.
बायणा समुद्रात मुरगन स्वामी आंघोळीसाठी गेला त्यावेळी तो दारूच्या नशेत होता अशी माहीती पोलीस सूत्रांनी दिली आहे. बुडून मरण पोचलेला मुरगन हा मुरगाव नगरपालिकेचा नगरसेवक धनपाल स्वामी यांचा भाऊ असून तो विवाहीत होता. पोलीस सदर प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.