कोरोना रुग्णाच्या संपर्कात गोव्याचा तरुण; रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 11:46 AM2020-03-11T11:46:05+5:302020-03-11T11:55:05+5:30
इटलीला असताना कोरोना रुग्णाच्या संपर्कात; गोव्याचा तरुण रुग्णालयात देखरेखीखाली
पणजी : जहाजावर काम करणारा एक 27 वर्षीय गोमंतकीय तरुण कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला होता. त्याला खोकला, ताप आदींची लागण झाल्यामुळे गोव्यातील बांबोळी येथील इस्पितळात दाखल व्हावे लागले आहे. त्याच्या विषयीचा वैद्यकीय अहवाल अजून आलेला नाही. पण त्याला रुग्णालयात स्वतंत्रपणे देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
आरोग्य मंत्री विश्वजित राणे तसेच गोमेकॉ रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. शिवानंद बांदेकर यांनी बुधवारी याबाबतची माहिती जाहीर केली. वास्को येथील सत्तावीस वर्षीय तरूण जून 2०19 पासून परदेशात जहाजावर होता. अनेक गोमंतकीय परदेशात जहाजावर नोकरीसाठी जात असतात. हा तरुण फिनलँड- युरोप येथे अडीच महिने जहाजावर होता. गेल्या फेब्रुवारी महिन्यात तो इटलीला पोहोचला होता. त्यावेळी तो कोरोना झालेल्या एका रुग्णाच्या संपर्कात आला होता. 138 क्रमांकाच्या कतार एअरवेजने तो गोव्यात आला. आरोग्य मंत्री राणे यांनी सांगितले, की त्याला गेले दोन दिवस खोकला व ताप आहे. त्याला गोमेकॉ इस्पितळात तातडीने दाखल करून घेण्यात आले आहे. बुधवारी सकाळपासून त्याला इस्पितळाच्या 113 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.
मंत्री राणे म्हणाले, की आम्ही वैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक ते नमुने पाठवले आहेत. पुणे येथील प्रयोगशाळेमधून अहवाल येईल. त्यानंतर स्थिती स्पष्ट होईल. गोमेकॉत संशयावरून दाखल झालेला हा तिसरा गोमंतकीय आहे. यापूर्वीच्या दोघा गोमंतकीयांसह चौघा परदेशी पर्यटकांना उपचाराअंती रुग्णालयातून घरी जाऊ दिले गेले. त्यांच्याविषयीचा अहवाल नकारात्मक आला होता.
गोमेकॉ रुग्णालय स्वत:ची स्वतंत्र वायरोलॉजी प्रयोगशाळा सुरू करणार आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला दरवेळी पुण्याच्या प्रयोगशाळेवर अवलंबून रहावे लागणार नाही. गोमंतकीयांनी सध्या कोणती काळजी घ्यायला हवी याबाबतची माहिती आम्ही यापूर्वीच दिलेली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येणे टाळायला हवे, असेही राणे यांनी म्हटले.