कांदा देशभरात सर्वात जास्त गोव्यात महाग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 08:39 PM2019-11-29T20:39:32+5:302019-11-29T20:51:10+5:30

महिला काँग्रेसच्या रणरागिणी कडाडल्या : सात दिवसात सवलतीच्या दरात उपलब्ध न केल्यास रस्त्यावर उतरु

 Onion is most expensive in Goa nationwide | कांदा देशभरात सर्वात जास्त गोव्यात महाग

कांदा देशभरात सर्वात जास्त गोव्यात महाग

Next
ठळक मुद्देशुक्रवारी राजधानी शहर बाजारपेठेत १२० रुपये किलो दर होता. गृहिणींचे बजेट यामुळे कोलमडून पडले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करुन सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध करावा.’

पणजी - देशभरात कुठेही नव्हे, एवढा गोव्यात कांदा महाग झालेला. शुक्रवारी राजधानी शहरात १२० रुपये किलो या दराने कांदा विकला गेला. या प्रचंड दरवाढीमुळे गृहिणींच्या तोंडचे पाणी पळाले असून संताप व्यक्त केला जात आहे. सात दिवसात सवलतीच्या दरात उपलब्ध न केल्यास रस्त्यावर उतरु, असा इशारा प्रदेश महिला काँग्रेसने दिला आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मध्यप्रदेशमध्ये ग्वाल्हेर शहरात कांद्याचा दर प्रती किलो ३८ रुपये आहे. दिल्लीत ७६ रुपये, मुंबईत ९२ रुपये, कोलकातामध्ये १०० रुपये किलो तर चेन्नइमध्ये ८० रुपये प्रती किलो असा कांद्याचा दर आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयातर्फे जीवनावश्यक अशा २२ वस्तूंच्या दरांचा आढावा रोज घेतला जातो. तांदूळ, गहू, आटा, साखर, तूरडाळ, उडीद डाळ, मूग डाळ, चणाडाळ, मसूर, साखर, गुळ, शेंगदाणा तेल, मोहरीचे तेल, वनस्पती तेल, सनफ्लॉवर तेल, पाम तेल. सोयाबिन तेल, चहा, दूध, कांदा, बटाटा, टोमॅटो, मीठ आदी वस्तूंचा यात समावेश असतो. देशभरातील १०९ बाजारपेठांमधून या वस्तूंचे दर प्राप्त केले जातात. दरवाढीच्या पार्श्वभूमीवर कांद्याची साठवणूक करण्यावरही निर्बंध घातलेले आहेत. किरकोळ व्यापारी १०० क्विंटलपर्यंत तर घाऊक व्यापारी ५०० क्विंटलपर्यंत कांदा साठवून ठेवू शकतात. निर्यातीवरही निर्बंध घातलेले आहेत.

दरम्यान, सरकारने सात दिवसात कांदा सवलतीच्या दरात उपलब्ध न केल्यास रस्त्यावर उतरु, असा इशारा प्रदेश महिला काँग्रेसने दिला आहे. बाजारात १२० रुपये किलो दर झालेला असून सरकारने २० रुपये कि लोने तो उपलब्ध करावा, अतिरिक्त रकमेचा भार सरकारने उचलावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या की, ‘देशात कुठेही नव्हे एवढा गोव्यात कांदा महागला आहे. शुक्रवारी राजधानी शहर बाजारपेठेत १२० रुपये किलो दर होता. गृहिणींचे बजेट यामुळे कोलमडून पडले आहे. संसार कसा चालवावा हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मागे नारळ महागले तेव्हा महिला काँग्रेसने सरकारचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरुन पेडणेपासून काणकोणपर्यंत १० रुपये नग याप्रमाणे स्वस्तात लोकांना नारळ उपलब्ध केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करुन सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध करावा.’

काँग्रेस सरकार सत्तेवर असताना महागाईच्या निषेधार्थ भाजपच्या महिला मोर्चा कार्यकर्त्या रस्त्यावर उतरायच्या. स्मृती इराणी यांनी अशी अनेक आंदोलने केली आहेत. आज कांद्याचा भाव गगनाला भिडला असताना त्या कुठे आहेत? असा सवाल कुतिन्हो यांनी केला.कुतिन्हो म्हणाल्या की, ‘ फलोत्पादन महामंडळाच्या दालनांसाठी येणाऱ्या भाज्या हॉटेलांना पुरविल्या जातात लोकांना त्या मिळत नाही. महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रवीण झांट्ये यांनी दालनांना आकस्मिक भेटी देऊन तपासणी करावी. देशाच्या अन्य भागांमध्ये कांदा स्वस्त असताना गोव्यातच महाग का, असा सवालही त्यांनी केला. पत्रकार परिषदेला अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Web Title:  Onion is most expensive in Goa nationwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.