ऑनलाईन शिक्षण सक्तीचे नाही; प्रमोद सावंत यांचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 07:42 PM2020-06-18T19:42:08+5:302020-06-18T19:43:56+5:30
ऑनलाईन शिक्षणाविषयी तक्रारी येतात, कारण नेटची कनेक्टीविटी मिळत नाही. राज्यभर ऑनलाईन शिक्षणासाठी आमच्याकडे पुरेशा साधनसुविधा नाहीत.
पणजी: शिक्षण खात्याने राज्यात कुठेच ऑनलाईन शिक्षणाची सक्ती केलेली नाही. ऑनलाईन शिक्षणाविषयी समस्या येतात याची कल्पना सरकारला आहे. मात्र मोबाईल टॉवरला गावांमध्ये विरोध करणारे काही लोक देखील या स्थितीला कारणीभूत आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी येथे सांगितले.
आझाद मैदानावर गोवा क्रांती दिन सोहळा पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. ऑनलाईन शिक्षणाविषयी तक्रारी येतात, कारण नेटची कनेक्टीविटी मिळत नाही. राज्यभर ऑनलाईन शिक्षणासाठी आमच्याकडे पुरेशा साधनसुविधा नाहीत. मात्र दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांविषयी सरकारला जास्त चिंता आहे. आम्ही त्यावर उपाय काढू. नियमित विद्यालये किंवा वर्ग सुरू करण्याचा निर्णय सरकारने अजून घेतलेला नाही. त्याविषयी यापुढे निर्णय होईल. सध्या नेटवर्कची समस्या गावांमध्ये वगैरे येते, कारण मोबाईल टॉवर उभे राहत होते तेव्हा त्या टॉवरना लोक विरोध करत होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोवा राज्याच्या सीमा सील करा अशी मागणी विरोधक करत असल्याविषयी पत्रकारांनी विचारले तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, की सीमा सिल करा असे सांगणो सोपे असते. गोमंतकीयांनाच दुसऱ्या ठिकाणहून गोव्यात यायचे असते. सिल केल्या तर तेही गोव्यात येऊ शकणार नाहीत. जेव्हा सीमा सिल होत्या तेव्हा भाजी व जीवनावश्यक वस्तू येत नाहीत म्हणून जे विरोध करत होते तेच आता सीमा सिल करा अशी मागणी करतात.
सरकारने खर्चात कपात सुरू करावी अशी मागणी जे करत होते, तेच आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठीची गृह कर्ज योजना बंद केली म्हणून टीका करतात. खर्च कपातीसाठीच्या उपाययोजनांचाच तो एक भाग आहे हे विरोधकांनी लक्षात घ्यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. अनेक खासगी उद्योगांनी कर्मचाऱ्यांचे पगार कापले, त्यांना कामावरून कमी केले हे सर्वानी लक्षात ठेवावे. गोव्याच्या सीमेवर पोलिस व आरोग्य कर्मचारी हे दोन्ही घटक चोवीस तास असतात. सीमेवर पहारा आहे. कोरोनाची लक्षणो दाखविणाऱ्यांची चाचणी होत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोवा स्वयंपूर्ण करूया: मुख्यमंत्री
दरम्यान, गोवा क्रांतीदिनाच्यानिमित्ताने आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाराला राज्यपाल सत्यपाल मलिक व मुख्यमंत्री सावंत यांनी पुष्पचक्र वाहिले. हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. गोवा मुक्तीसाठी स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान केले. राममनोहर लोहिया, लवंदे, मिनेङिास ब्रागांझा आदी अनेकांनी त्याग केला. त्यांच्यापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी व गोव्याला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी आजच्या युवकांनी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केली.
राममनोहर लोहिया यांनी गोमंतकीयांना लढण्यासाठी स्फुर्ती दिली. पंतप्रधान मोदी यांनी भारताला आत्मनिर्भर बनवूया असे म्हटले आहे. आम्ही त्याचप्रमाणो गोव्याला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी एकत्र प्रयत्न करूया, यासाठी सरकारला लोकसहभागाची व युवकांच्या योगदानाची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.