गोमंतकीयांनो पाणी जपून वापरा; धरणांत ५० टक्केच पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 08:57 AM2023-04-02T08:57:56+5:302023-04-02T08:58:17+5:30
पावसाळ्याला अजून दोन महिने आहेत आणि तिलारी वगळता गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणातील पाणीसाठा निम्म्याने संपला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पावसाळ्याला अजून दोन महिने आहेत आणि तिलारी वगळता गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणातील पाणीसाठा निम्म्याने संपला आहे. त्यामुळे यंदा पाण्यासाठी कसरत करावी लागणार, असे संकेत आहेत. दक्षिण गोव्यातील जवळजवळ निम्म्या अधिक गावे व शहरांची तहान भागविणाऱ्या साळावली धरणात निम्म्यापेक्षा कमी पाणी आहे. २३४३६ हेक्टर मीटर क्षमतेच्या या धरणात आता ११८२७ हेक्टर मीटर पाणी शिल्लक आहे.
हणजुणे धरणात ३५ टक्क्यांहून कमी पाणी शिल्लक राहिले आहे. काणकोण तालुक्याला पाणी पुरविणाऱ्या चापोली धरणात ६० टक्क्यांहून कमी पाणी शिल्लक आहे. आमठाणे पाणी प्रकल्पातही ५५ टक्क्यांहून कमी पाणी शिल्लक आहे. आमठाणीत ३० टक्के पाणी तर गावणे प्रकल्पात ५५ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. त्यातल्या त्यात दिलासा तो तिलारी धरणाचा ४६२१७ हेक्टर मीटर क्षमतेचे हे धरण महाराष्ट्रात जरी असले तरी त्यातील ७६ टक्के पाणी हे गोव्याच्या वाट्याला येते. उत्तर गोव्यात मोठ्या प्रमाणावर हे पाणी पुरविले जाते. या धरणात अजून ९६ टक्के पाणी शिल्लक आहे.
साळावलीवर भरवसा
साळावली धरणाचे पाणी ५० टक्क्यांपेक्षा कमी शिल्लक असले तरी हे धरण प्रचंड क्षमतेचे असल्यामुळे कधीच कोरडे पडणार नाही, असा जलस्रोत खात्यासह सांगेवासीयांनाही भरवसा आहे. स्थानिक आमदार आणि मंत्री सुभाष फळदेसाई सांगतात की, साळावलीचे पाणी आतापर्यंत कधीच संपलेले घाबरण्याची गरज नाही. जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांचीही भिस्त याच धरणावर आहे.
चिंता नको
राज्यातील धरणांची पातळी खाली गेली असली तरी काहीच चिंता करण्याची गरज नाही. साळावली धरणात विद्यमान स्थितीत १०९ दशलक्ष घनमीटर इतके पाणी असून ते सिंचन व इतर कामासाठी वापरूनही ९० दिवस पुरेल इतके आहे. त्यामुळे निदान पाण्याच्या उपलब्धतेबद्दल तरी चिंता करण्याचे कारण नाही असे ते सांगतात. - सुभाष शिरोडकर, जलस्रोतमंत्री.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"