नोटीस आल्यानंतरच योग्य तो निर्णय घेऊ
By Admin | Published: April 1, 2017 02:12 AM2017-04-01T02:12:05+5:302017-04-01T02:12:49+5:30
मडगाव : लुईस बर्जर लाच प्रकरणात आरोपपत्र दाखल झालेले मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि बाणावलीचे आमदार चर्चिल
मडगाव : लुईस बर्जर लाच प्रकरणात आरोपपत्र दाखल झालेले मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांच्या मालमत्तेवर एन्फोर्समेंट डिपार्टमेंटकडून टाच आल्याने सध्या सासष्टीत हा चर्चेचा विषय बनलेला असताना दोन्ही नेत्यांनी अजूनही आम्हाला याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही त्यासंदर्भात काहीच बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
दिगंबर कामत यांनी शुक्रवारी पाणी खात्याच्या अभियंत्यांबरोबर बैठक घेतली होती. या वेळी पत्रकारांनी त्यांना या कारवाईबद्दल विचारले असता, मला अजूनही ईडीकडून कुठलीही नोटीस आलेली नाही. मी फक्त ही बातमी वृत्तपत्रांतून वाचली आहे. जोपर्यंत नोटीस येत नाही, तोपर्यंत त्यावर भाष्य करता येणे शक्य नाही. अशी नोटीस आलीच तर माझे वकील त्याला उत्तर देतील, असे ते म्हणाले.
दरम्यान, ही कारवाई म्हणजे राजकारणाचाच एक भाग असल्याची प्रतिक्रिया कामत यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कामत यांना पुन्हा एकदा अडचणीत आणण्याचा जाणूनबुजून केलेला हा प्रयत्न, अशा प्रतिक्रिया या समर्थकांकडून व्यक्त होत आहेत.
बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनीही या कारवाईबद्दल मला अजिबात माहिती नाही, असे सांगताना ज्या फ्लॅटबद्दल बोलले जात आहे ते फ्लॅट मला व माझ्या कुटुंबीयांना एका बिल्डरने पूर्वजांच्या जमिनीच्या व्यवहारात दिले होते, असे ते म्हणाले. यासंदर्भात आलेमाव यांना विचारले असता, अजूनपर्यंत मलाही ईडीकडून नोटीस आलेली नाही. ही नोटीस आल्यावर कायदेशीर सल्ला घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)