शत-प्रतिशत भाजप सरकारच हवे
By admin | Published: March 4, 2017 01:45 AM2017-03-04T01:45:47+5:302017-03-04T01:53:44+5:30
पणजी : राज्यात शत-प्रतिशत भाजप सरकारच असायला हवे, अन्य पक्षांच्या कुबड्या नकोतच. मगोपविरहित भाजप सरकार स्थापन
पणजी : राज्यात शत-प्रतिशत भाजप सरकारच असायला हवे, अन्य पक्षांच्या कुबड्या नकोतच. मगोपविरहित भाजप सरकार स्थापन होणे पक्षाच्या हिताचे आहे व या वेळी ते शक्यही आहे, असा विश्वास वनमंत्री तथा भाजपच्या कोअर टीमचे एक ज्येष्ठ सदस्य राजेंद्र आर्लेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
आर्लेकर म्हणाले की, आपण स्वत: पेडणे मतदारसंघातून निश्चितच विजयी होईन. फक्त मतांची आघाडी २०१२ च्या तुलनेत कमी असेल. त्या वेळी साडेआठ हजारांची आघाडी होती. या वेळी पाच हजारांच्या आसपास ही आघाडी असेल. आपल्यासाठी प्रमुख प्रतिस्पर्धी मगोप होता; पण भाजप-मगोप व काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली आहे.
ते म्हणाले की, प्रारंभी उगाच मगोपची हवा तयार झाली होती. या वेळी भाजप-मगोप युती नसली तरी, भाजपची मते फुटलेली नाहीत. मगोपला मगोपचीच मते मिळतील. युती नसल्याने मला व भाजपला जास्त जोमाने प्रचार करावा लागला.
या वेळी त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येणार नसून भाजपला बावीस ते तेवीस जागा प्राप्त होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी नव्या सरकारमध्ये मंत्री असेन; पण त्याविषयी आताच जास्त बोलण्याचे मला कारण दिसत नाही. शेवटी मंत्री कोणाला करावे ते त्या वेळचे मुख्यमंत्री व पक्ष ठरवतील, असेही त्यांनी सांगितले.
आर्लेकर म्हणाले की, मगोपने अनेक मतदारसंघांमध्ये या वेळी उमेदवार उभे केले. यामुळे भाजपची मते फुटली असे म्हणता येत नाही. मात्र, यापुढे भाजपचा विस्तार नियोजनपूर्वक व जोमाने करावा लागेल. परिणामवश भविष्यात सतत भाजप स्वबळावरच सत्तेत राहील. स्थिरता म्हणजे विकास हे सर्वांना ठाऊक आहे. लोकांनी स्थैर्यासाठी भाजपला मते दिलेली आहेत. महिलावर्गाने मोठ्या संख्येने या वेळी भाजपसाठी मतदान केले
आहे.
(खास प्रतिनिधी)