पहिल्या निवडणुकीत फक्त ५ हजार रुपये खर्च: प्रतापसिंग राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2024 09:45 AM2024-05-06T09:45:33+5:302024-05-06T09:46:50+5:30
पन्नास वर्षे राजकारणात राहूनही राणे यांनी आपली प्रतिमा चांगली राखली.
विशेष प्रतिनिधी, लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : माझ्या पहिल्या विधानसभा निवडणुकीवेळी मला फक्त पाच हजार रुपयांचा खर्च आला होता, अशी आठवण माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी 'लोकमत'ला सांगितली. राणे हे गोव्यात साडेसतरा वर्षे मुख्यमंत्रिपदी होते. सभापती व विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केले. पन्नास वर्षे राजकारणात राहूनही राणे यांनी आपली प्रतिमा चांगली राखली.
राणे यांना त्यांच्या आयुष्यातील पहिल्या विधानसभा निवडणुकीबाबत 'लोकमत'ने विचारले असता, राणे म्हणाले की, माझ्याकडे त्यावेळी एक जीप होती. त्या जीपमधून मी प्रचार केला होता. पूर्ण सत्तरी तालुका म्हणजे एक विधानसभा मतदारसंघ होता. मी मगो पक्षाच्या तिकिटावर सत्तरीतून निवडून आलो होतो. त्यावेळी भाऊसाहेब बांदोडकर आमचे नेते होते. मी अमेरिकेत शिकून आलो होतो. भाऊंनी मला पहिल्यांदा निवडणुकीचे तिकीट दिले. मी जिंकलो आणि मग राजकीय कारकीर्द सुरू झाली.
तुम्हाला पूर्वीचे जुने कार्यकर्ते अजून आठवतात का? असे विचारले असता, राणे म्हणाले की, निश्चितच आठवतात. काहीजण आता खूप वयस्कर झाले आहेत, तर काहीजणांचे निधन झाले आहे. सत्तरीतील लोकांची कधी तरी भेट होतेच.
राणे म्हणाले की, माझ्या पहिल्या एक-दोन निवडणुकांवेळी स्थिती वेगळी होती. फक्त पाच हजार रुपयांत निवडणूक लढवता येत होती. आता राजकारण खूप बदलले आहे. जीपमधून मोजके कार्यकर्ते माझ्या पहिल्या निवडणुकीवेळी फिरले होते. कार्यकर्त्यांसाठी तेव्हा जास्त खर्च नव्हता.
पन्नास वर्षांत एकदाही पराभूत नाहीच
प्रतापसिंग राणे यांनी अगोदर भाऊंच्या मंत्रिमंडळात काम केले होते. मग भाऊंच्या निधनानंतर स्व. शशिकला काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या मंत्रिमंडळातही काम केले. पुढे मगो पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली होती. पुढे पूर्ण आयुष्य त्यांनी काँग्रेसतर्फेच निवडणुका लढविल्या व पन्नास वर्षांत ते कधीच पराभूत झाले नाहीत, हे विशेष मानावे लागेल.