चला, १४ धबधबे खुले! वनखात्याचा आदेश; कर्मचारीही तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 04:02 PM2023-07-20T16:02:42+5:302023-07-20T16:02:57+5:30
दारू सेवन करून धांगडधिंगा पर्यटकांना घालायला मिळणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील धोकादायक नसलेले एकूण १४ धबधबे लोकांसाठी खुले करण्यात आले आहेत. गोवा वनखात्याने असा आदेश जारी केला आहे. पण, या ठिकाणी वनखात्याचे कर्मचारी तैनात असणार असून दारू सेवन करून धांगडधिंगा पर्यटकांना घालायला मिळणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात मैनापी धबधब्यावर दोघांचा बुडून मृत्यू झाला होता. अन्य ठिकाणी असेच पर्यटकांचा बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडल्या. यामुळे मुख्यमंत्री, वनमंत्री तसेच वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन वनखात्याच्या क्षेत्रात येणाऱ्या धबधब्यांवर लोकांना प्रवेश बंद केला होता. त्यामुळे दूधसागर धबधब्यावर हजारो पर्यटकांना प्रवेश दिला नाही. तसेच अन्य सर्वच धबधब्यांवर प्रवेश बंद केला. पण आता नवीन आदेश काढून धोकादायक नसलेले १४ धबधबे खुले केले आहेत.
दूधसागर बंदच
वनखात्याने १४ धोकादायक नसलेल्या धबधब्यावर प्रवेश खुला केला असला तरी दूधसागर तसेच इतर धोकादायक धबधब्यांवर लोकांना प्रवेश बंद आहे. या ठिकाणी पर्यटक धबधब्याचा आनंद घेऊ शकत नाहीत.
इथे जाता येणार
म्हादई अभयारण्यात असलेले सत्तरी, पाली, चरावणे, गोळाली, चिदंबर, नानेली, उकीचे खडे कुमठळ, तसेच चोर्ला घाटात जाताना वाटेत मिळणार माडयानी, खाडे या धबधब्यावर प्रवेश खुला केला आहे. तर भगवान महावीर क्षेत्रातील मयडा कुळे धबधबा, नेत्रावली अभयारण्यातील भाटी नेत्रावळी आणि खोतीगाव अभयार यातील कुसके खोतीगाव या धबधब्यावर प्रवेश खुला करण्यात आला आहे.