उघड्यावरील शौचामुळे गोव्यातील वाळवंटीचे पाणी प्रदुषित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 05:27 PM2019-01-01T17:27:47+5:302019-01-01T17:28:34+5:30
साखळी आरोग्य केंद्रातर्फे केलेल्या तपासणीत गोव्याच्या राज्य हमरस्ता - 4 च्या कक्षेत एकही सार्वजनिक शौचालय नसल्याचे दिसून आले.
मडगाव: नदीच्या काठी मोठय़ा प्रमाणावर केल्या जाणा:या शौच विसर्जनाचा विपरित परिणाम साखळीच्या वाळवंटी नदीवर झाला असून या नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी राज्य हमरस्त्याला जोडून सार्वजनिक शौचालये उभारावीत अशी सुचना गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळाने केरी ग्रामपंचायतीला केली आहे. या नदीच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले असता त्यात बायोकेमिकल ऑक्सीजन डिमांड आणि कॉलिफॉर्मचे प्रमाण अपेक्षित प्रमाणापेक्षा ब:याच मोठय़ा प्रमाणावर अधिक असल्याचे दिसून आले आहे.
हल्लीच साखळी आरोग्य केंद्रातर्फे केलेल्या तपासणीत गोव्याच्या राज्य हमरस्ता - 4 च्या कक्षेत एकही सार्वजनिक शौचालय नसल्याचे दिसून आले. त्याशिवाय या नदीच्या जवळ जी वस्ती आहे तिथेही कित्येक घरांना शौचालये नसून केरी आणि मोर्ले या गावातील लोक आपले सांडपाणी सरळ नाल्यात सोडून देत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर गावक:यांना आरोग्य केंद्रातर्फे नोटीसा जारी करुन आपले सांडपाणी सॉकपिटमध्ये सोडावे. एवढेच नव्हे तर ज्या घरांना सेप्टीक टँक व सॉकपिटस् आहेत ती नदीच्या पात्रपासून 15 मीटर दूर हलवावीत असे कळविण्यात आले आहे.
वाळवंटी ही गोव्यातील महत्वाची नदी असून महाराष्ट्रातील रेड्डी गावातून ती सूरु होते. गोव्यात केरी, मोर्ले, पर्ये, साखळी व कारापूर गावातून ती वाहत असून नंतर मांडवी नदीला ती मिळते. या नदीच्या काठावर सार्वजनिक शौचालये नसल्याने आंतरराज्य मार्गावर वाहतूक करणारे ट्रकवाले वाळवंटीची उपनदी असलेल्या कल्टी नदीच्या काठावर शौचाला बसतात. मुस्लीमवाडा, तेमवाडा व चौथरावाडा येथे हे प्रकार घडतात. त्याशिवाय याच नदीला जोडलेल्या कुसडो नदीच्या काठी असलेल्या गडेवाडा, हरिजनवाडा, हरिदवाडा, पार्सेकर वाडा आणि शिरोळीतल्या काही नाल्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर कचरा टाकून देत असल्याचेही दिसून आले आहे. पर्ये येथेही नदीच्या काठी शौचाला बसण्याचे प्रकार घडत असून याच नदीत कपडेही धुतले जात असल्यामुळे नदीचे प्रदुषण वाढले आहे.
या प्रदुषणासंदर्भात हल्लीच एका वृत्तपत्रवर आलेल्या बातमीची स्वेच्छा दखल गोवा मानवाधिकार आयोगाने मागच्या महिन्यात घेतली होती. त्यानंतर या आयोगाने गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळ, पंचायत संचालक, आरोग्य संचालक, पाटबंधारे खात्याचे मुख्य अभियंते तसेच मोर्ले, केरी आणि पर्ये येथील पंचायतीच्या सचिवांना नोटीसा जारी केल्या होत्या.