त्याने दरवाजा उघडला आणि विमानच बिघडले; 'दाबोळी'तील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 04:05 PM2023-05-07T16:05:40+5:302023-05-07T16:07:01+5:30
आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाविरोधात गुन्हा.
लोकमत न्यूज नेटवर्क वास्को: दाबोळीहून चंडीगडला जाणाऱ्या 'इंडिगो एअरलाइन्स'च्या विमानात एका प्रवाशाच्या निष्काळजीपणामुळे प्रवासी व केबिन क्रू सदस्यांसह १७९ जणांचा जीव धोक्यात आला होता. विमानातील प्रवासी विशाल शांडिल्य (वय २८, रा. हिमाचल प्रदेश) याने आपत्कालीन दरवाजाचे हँडल खेचल्याने विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. गुरुवारी (दि. ४) ही घटना घडली होती.
दाबोळी विमानतळावरील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंडीगडला जाणाऱ्या 'इंडिगो एअरलाइन्स'च्या विमानातील प्रवासी विशाल याने निष्काळजीपणाने 'ओव्हर विंग कव्हर फ्लॅप' आणि आपत्कालीन दरवाजाचे कंट्रोल हँडल खेचले त्यामुळे विमानात तांत्रिक बिघाड झाला. आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, या प्रकाराने विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे विमानातील क्रू सदस्य आणि प्रवासी अशा सर्व १७९ जणांना खाली उतरविण्यात आले. नंतर विमानाची दुरुस्ती करून तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या विमानाने दाबोळीवरून उड्डाण केले.
दरम्यान, याप्रकरणी शानवा शेख यांनी दाबोळी विमानतळ पोलिस स्थानकावर तक्रार नोंदवली. त्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी विशाल शांडिल्य याच्याविरुद्ध भादंसं कलम ३३६ अन्वये गुन्हा नोंदवला. विमानतळ पोलिस स्थानकाचे सहायक उपनिरीक्षक संतोष गावकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
....तर धोका वाढला असता...
हिमाचल प्रदेशातील प्रवासी विशाल शांडिल्य याने नेमका असा प्रकार का केला, याबाबत पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. त्याने निष्काळजीपणाने आपत्कालीन दरवाजाचे हँडल खेचल्याने विमानात तांत्रिक बिघाड झाला. सुदैवाने विमानात फक्त तांत्रिक बिघाड झाला. मात्र, पुढील धोका टळल्याची माहिती विमानतळावरील सूत्रांकडून प्राप्त झाली. जर विमान प्रवासात असता असा प्रकार घडला असता तर सर्वांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता.