विरोधक संतापले! लक्षवेधी सूचनेवरून सभापतींसमोर धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2024 08:04 AM2024-07-23T08:04:10+5:302024-07-23T08:05:06+5:30
दीड तास विधानसभेचे कामकाज तहकूब
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांनी एल्टन डिकॉस्टा यांच्या माफीनाम्यावरुन सभागृहात गोंधळ घातल्यानंतर दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे काल, सोमवारी विरोधकांच्या गदारोळामुळे दीड तास कामकाज तहकूब करावे लागले. सरकार वारंवार लक्षवेधी सूचना टाळत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभापतींच्या आसनासमोरील हौदात धाव घेतली.
यावेळी सभापती विरोधकांना शांत राहण्यास सांगत होते मात्र, गदारोळ सुरूच राहिल्याने अखेर तवडकर यांनी कामकाज २:३० वाजेपर्यंत तहकूब केले. दोन लक्षवेधी सूचना सरकारला देण्यात आल्याने विरोधक आक्रमक झाले. आम्हाला दोनपैकी एक लक्षवेधी सूचना मिळायला हवी होती, अशी त्यांची मागणी होती.
विद्याप्रबोधिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला उद्भवणाऱ्या धोक्यांसंदर्भात शून्य तासाला विषय मागण्याची परवानगी मागितली होती. तीदेखील दिली नाही. एकंदरीत विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. महत्त्वाचे विषय आम्हाला मांडू देत नाही, हा आमच्यावर अन्याय आहे, अशी मागणी करत सातही विरोधी आमदार थेट सभापतींच्या हौदात गेले.
समितीच्या बैठकीत विरोधी पक्षाच्या आमदारांची एक लक्षवेधी सूचना चर्चेला घ्यावी, अशी चर्चा झाली होती. पण प्रत्यक्षात याची अंमलबजावणी झाली नाही. युरी आलेमाव यांचे म्हणणे ऐकून घेत सभापतींनी विधिमंडळ सचिव नम्रता उल्मन यांनी याची दखल घ्यावी, अशी सूचना केली होती. पण या सूचनेला न जुमानता आलेमाव थेट उठून सभापतीच्या हौदाकडे गेले. त्यांच्यापाठोपाठ विजय सरदेसाई, कार्ल्स फेरेरा, वेंझी व्हिएगश, कुन सिल्वा, एल्टन डिकॉस्टा वीरेश बोरकर हेही आपली जागा सोडत हौदाकडे पोहचले होते.
... अन् युरी उठले
विधानसभेच्या आजच्या कामकाज सूचिवर संकल्प आमोणकर व सांताक्रूझचे रुडॉल्फ फर्नाडिस यांच्या लक्षवेधी सूचनांवर चर्चा होणार असल्याचे नमूद केले होते. शून्य तास संपल्यानंतर सभापतींनी लक्षवेधी सूचना पुकारल्यावर विरोधी पक्षनेता युरी आलेमाव उठले आणि आम्हाला एकही लक्षवेधी सूचना देण्यात येत नाही, असे बोलत हल्लाबोल केला.