विरोधक फ्लॉप वागले; ‘त्या’ निर्णयातून विरोधकांमधील हतबलता दिसली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 12:33 PM2023-07-12T12:33:19+5:302023-07-12T12:34:18+5:30

संपादकीय: आपण विधानसभेत पाठविलेले सगळेच विरोधी आमदार असाहाय्य, निराश व निराधार आहेत की काय अशी शंका सामान्य गोंयकारांच्या मनात येईलच.

Opponents flopped; The desperation of the opponents was seen from 'that' decision | विरोधक फ्लॉप वागले; ‘त्या’ निर्णयातून विरोधकांमधील हतबलता दिसली

विरोधक फ्लॉप वागले; ‘त्या’ निर्णयातून विरोधकांमधील हतबलता दिसली

googlenewsNext

प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनाच भाजपकडून राज्यसभेचे तिकीट राज्यसभा निवडणुकीवेळी दिले जाईल हे स्पष्टच होते. तानावडे यांनी काल उमेदवारी अर्ज भरला. तानावडे यांचे केवळ भाजपच्याच आमदारांशी चांगले संबंध आहेत असे नव्हे, तर अन्य पक्षीय आमदारांशीदेखील आपुलकीचे नाते आहे. अनेकांना ठाऊक नसेल, पण तानावडे ९०च्या दशकात पीर्ण ग्रामपंचायतीचे पंच होते. कमी वयात ते उपसरपंचही झाले होते. त्यांना आता चक्क राज्यसभा खासदार होण्याची संधी मिळत आहे, ही भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी खूप आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. मात्र गोव्यातील सर्व सातही विरोधी आमदारांनी मिळून काल जो निर्णय घेतला, त्यातून विरोधकांमधील हतबलता दिसून आली. 

आपण विधानसभेत पाठविलेले सगळेच विरोधी आमदार असाहाय्य, निराश व निराधार आहेत की काय अशी शंका सामान्य गोंयकारांच्या मनात येईलच. प्रत्येक निवडणूक ही जिंकण्यासाठीच लढायची नसते हे येथे लक्षात घ्यावे लागेल. काही लढाया या आपले फायटिंग स्पिरीट दाखवून देण्यासाठी व सत्ताधाऱ्यांमध्ये संभ्रम व फूट निर्माण करण्यासाठी लढायच्या असतात. आम्ही राज्यसभेसाठी उमेदवार उभा करणार नाही, असे काल सातही विरोधी आमदारांनी जाहीर केले. ही कसली पचपचीत रणनीती? एरव्ही विजय सरदेसाई वगैरे आमदार स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांना आपला राजकीय आदर्श मानतात. मात्र पर्रीकर यांचे फायटिंग स्पिरीट कोणत्याच विरोधी आमदाराने शिकून घेतले नाही. पर्रीकर जेव्हा भाजपचे नेते होते तेव्हा भाजपकडे कमी आमदार असतानादेखील भाजपने राज्यसभा निवडणूक लढवली होती. 

वीस वर्षांपूर्वी राज्यात काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे काँग्रेसचाच उमेदवार जिंकणार हे स्पष्ट होते, पण राज्यसभा निवडणुकीवेळी पर्रीकर यांनी संजीव देसाई यांना उमेदवार म्हणून उभे केले होते. पराभव अटळ होता, पण पक्षनिष्ठा व पक्षाचा आदेश महत्त्वाचा असे मानून देसाई यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. स्वर्गीय शांताराम नाईक यांचे त्यावेळी अनेकांशी चांगले संबंध होते. नाईक हेच खासदार होतील हे अगदी स्पष्ट होते, पण लढाऊ बाणा दाखवत भाजपने संजीव देसाई यांना रिंगणात उतरवले होते. यामागील कारण असे की विरोधकांनी उमेदवार उभा केला की विरोधकांचे कार्यकर्ते, समर्थक यांच्यातही उत्साह तयार होत असतो. त्यांच्यातील स्पिरीट कायम राखण्यासाठी नेत्यांनी कायम आश्वासक चित्र उभे करायचे असते. 

सत्ताधाऱ्यांमधील काहीजणांची मते फुटतील व आमच्या उमेदवाराला मते मिळतील असे चित्र युरी आलेमाव, विजय, वेन्झी वगैरे आमदारांनी मिळून तयार करता आले असते. भाजपला आम्ही मोकळे रान देत नाही, आम्ही लढणार आहोत, प्रसंगी पराभव झाला तरी हरकत नाही, अशी भूमिका सातही आमदार मिळून घेऊ शकले असते मात्र आम्ही निवडणूकच लढवत नाही अशी पचपचीत भूमिका घेऊन विरोधकांनी अगोदरच शस्त्रे खाली ठेवली आहेत. कदाचित भाजपची मते फुटण्याऐवजी आपल्याच सातजणांपैकी एक-दोघांची मते फुटतील, अशी भीती वाटली नाही ना?

जो आमदार आपण वेगळे आहोत, असा दावा करतो, त्या आपने तरी भाजपला रान मोकळे द्यायची गरज नव्हती. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होत होते त्या काळातदेखील मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर निवडणुका लढवत होतेच. त्यामुळेच त्या नेत्यांबाबत लोकांमध्ये एका टप्प्यावर विश्वास निर्माण झाला. आपले डिपॉझिट जाणार व त्यामुळे आपल्याला निवडणूकच नको, अशी भूमिका पर्रीकर यांनी किंवा भाजपनेही कधी घेतली नव्हती. मनोहर पर्रीकर तर १९९६ साली लोकसभा निवडणूक लढले होते. हरणार हे ठाऊक असूनही ते लढले होते. पराभव झाल्यानंतर पर्रीकर सांगायचे की हरलो तरी आमची मतांची टक्केवारी वाढली आहे. कार्यकर्त्यांना चार्ज ठेवण्यासाठी, त्यांचा हुरूप वाढविण्यासाठी कायम लढायचे असते. पळपुटी भूमिका घ्यायची नसते. सातही आमदारांनी काल नांगी टाकली हे धक्कादायक आहे.

 

Web Title: Opponents flopped; The desperation of the opponents was seen from 'that' decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.