सहकारात महिलांना, युवकांना संधी: मंत्री सुभाष शिरोडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 09:11 AM2023-11-21T09:11:15+5:302023-11-21T09:13:25+5:30
भारतीय सहकार सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : सहकार क्षेत्र हे एकमेव असे क्षेत्र आहे ज्यामधून बेरोजगारांना रोजगार देण्याची क्षमता आहे. यासाठी गावातील काही महिलांनी व युवा वर्गाने पुढे येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. महिलांना व युवकांना पुढे येऊन स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी उत्तम संधी आहे. त्याचा लाभ घ्यावा व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.
बाजार शिरोडा येथे गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहामध्ये रविवारी गोवा सरकारच्या सहकार खात्यामार्फत ७० वा अखिल गोवा भारतीय सहकार सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष शिरोडकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सन्मानीय पाहुणे म्हणून जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, शिरोडा पंचायतीच्या सरपंच मुग्धा शिरोडकर, सहकार निबंधक मॅन्युएल बॅरेटो, प्रमुख व्यक्ती म्हणून डॉक्टर मधु घोडकिरेकर प्राध्यापक स्मिता श्रीवास्तव, बोरीचे सरपंच दुमिंगो वाज, बेतोडा सरपंच मधु खांडेपारकर, दुर्गेश गावडे, विनय नार्वेकर शिवानंद नाईक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. सुभाष शिरोडकर पुढे म्हणाले, शैक्षणिकदृष्ट्या शिरोडा गाव राज्यात पुढे आहे. सहकार क्षेत्रातही शिरोडा गाव पुढे येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. सत्तरी तालुक्यात दिवसाला सहा हजार लिटर दूध उत्पादन होते. तर इतर तालुक्यातील दूध उत्पादनावर शेतकऱ्यांनी भर देण्याची आवश्यकता आहे.
महिला एकत्र येत सुरु करु शकतात व्यवसाय
पाच ते दहा महिला एकत्र येऊन सहकार क्षेत्रात चांगली कामे करून स्वतः व्यवसाय सुरू करू शकतात. त्यासाठी केवळ महिलांनी पुढे येऊन इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. मधु घोडकिरेकर, प्राध्यापक स्मिता श्रीवास्तव यांनी विशेष कामगिरी बजावल्याबद्दल संस्था व व्यक्तींचा मंत्री शिरोडकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी मॅन्युएल बॅरेटो यांनी सर्वांचे स्वागत केले. गौरी शिरोडकर यांनी सूत्रसंचालन केले.