मणिपूर प्रश्नावरून विरोधकांचा सभात्याग; सभागृहाबाहेर येत विरोधी आमदारांचे ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 11:23 AM2023-08-05T11:23:31+5:302023-08-05T11:24:51+5:30
सभापतींनी ठराव फेटाळल्याने पुन्हा राडा
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: मणिपूर हिंसाचार विषयावर विधानसभेत चर्चा करावी, या मागणीवरून शुक्रवारी विरोधक पुन्हा एकदा आक्रमक बनल्याने गदारोळ झाला. यावेळी काळे कपडे परिधान केलेल्या विरोधी आमदारांनी सभापतींच्या आसनाकडे धाव घेतली. मात्र, या विषयावरील चर्चेचा ठराव सभापती रमेश तवडकर यांनी फेटाळून लावला. त्यानंतर विरोधी आमदारांनी सभात्याग करत बाहेर येऊन ठिय्या आंदोलन केले. तसेच राज्य सरकारविरोधात घोषणाबाजीही केली.
मणिपूरचा विषय हा अत्यंत संवेदनशील आहे. हा विषय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असून, राज्य तसेच केंद्र सरकारने या विषयाची दखल घेतली आहे. त्यामुळे मणिपूर हिंसाचार या विषयावरील चर्चेसाठी दाखल केलेला खासगी ठराव आपण फेटाळत असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी स्पष्ट केले.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सभापतींसमोर मणिपूरच्या विषयावर चर्चा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. यावेळी आमदार विजय सरदेसाई सोडले तर अन्य सर्व विरोधी आमदारांनी काळे कपडे परिधान केले होते. मात्र, सभापतींनी मणिपूर हिंसाचार विषयावरील ठराव फेटाळत सभागृहाचे कामकाज स्थगित केले.
पब्लिसिटीसाठी गोंधळ घालू नका
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, मणिपूरचा विषय हा सर्वोच्च न्यायालयात आहे. केंद्र सरकारसुद्धा त्याची दखल घेऊन कारवाई करत आहे. मणिपूरच्या लोकांना गोमंतकीयांचा पाठिबा आहे. केवळ पब्लिसिटीसाठी विरोधी आमदारांनी मणिपूरच्या विषयावरून गोंधळ घालू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरदेसाई गैरहजर
मणिपूर विषयावर चर्चा करण्यासाठीचा ठराव सभापती रमेश तवडकर यांनी फेटाळल्याने विरोधी आमदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आला, आमदार विरेश बोरकर, एल्टन डिकॉस्टा, वेन् व्हिएस व कुझ सिल्वा यांनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले. मात्र, यावेळी फातोडांचे आमदार विजय सरदेसाई गैरहजर होते.