दक्षिण गोव्यात पंचायत स्तरावरही सीएए कायद्याला विरोध; बाणावली ग्रामसभेत ठराव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 03:39 PM2020-01-27T15:39:28+5:302020-01-27T15:39:42+5:30
नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी गोव्यात सुरू झालेले आंदोलन आता ग्रामपातळीवरही पोहोचले
मडगाव: नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी गोव्यात सुरू झालेले आंदोलन आता ग्रामपातळीवरही पोहोचले असून, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त झालेल्या खास ग्रामसभेत बाणावलीच्या नागरिकांनी सीएए कायद्याचा विरोध करण्याचा ठराव संमत केला. गोव्यातील सर्व ग्रामसभांनी अशा त-हेचे ठराव घ्यावेत, असे आवाहन मागच्या शुक्रवारी मडगावात झालेल्या चर्चप्रणीत संघटनेच्या जाहीर सभेत करण्यात आली होती.
झेंडावंदन झाल्यानंतर घेतलेल्या ग्रामसभेत सीएएच्या विरोधात चालू असलेले आंदोलन शांततेने पुढे न्यावे, असा ठराव घेण्यात आला. या कायद्यामुळे नागरिकांच्या हक्कावर येणाऱ्या निर्बंधाची माहिती सर्वापर्यंत पोहोचविण्याची गरज रॉयला फर्नांडिस यांनी व्यक्त केली. सुमारे २0 नागरिकांनी सीएएविरोधी भाषणे केली. या आंदोलनाला चर्चचाही पाठिंबा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर सायंकाळी बाणावलीच्या मारिया हॉलपासून सीएए कायद्याला विरोध करणारे फलक घेऊन मोर्चा काढण्यात आला.
मडगावात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या निवासस्थानी झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातही संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून घटनेचे रक्षण करण्याची शपथ उपस्थितांनी घेतली. यावेळी मडगाव गट कॉंग्रेसचे अध्यक्ष गोपाळ नाईक, दक्षिण गोवा कॉंग्रेस सचिव दीपक खरंगटे, मडगावच्या नगरसेविका डोरिस टेक्सेरा, दीपा शिरोडकर, नगरसेवक अविनाश शिरोडकर, माजी नगरसेवक दामोदर शिरोडकर, लक्ष्मीकांत कामत, गुरुनाथ लाड, कॉंग्रेसचे कार्यकर्ते नागरिक व विद्यार्थ्याचा समावेश होता.