... तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होईल निर्माण: युरी आलेमाव यांचा सरकारला इशारा
By पूजा प्रभूगावकर | Published: March 8, 2024 04:39 PM2024-03-08T16:39:55+5:302024-03-08T16:41:32+5:30
राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरण कामावेळी घरांचे संरक्षण करण्यास जर सरकारला अपयश आले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा विरोधी पक्षनेता युरी आलेमाव यांनी दिला.
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: कुंकळ्ळी ओद्यौगिक वसाहतीमधील प्रदुषणाचा प्रश्न सोडवण्यास तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरण कामावेळी घरांचे संरक्षण करण्यास जर सरकारला अपयश आले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा विरोधी पक्षनेता युरी आलेमाव यांनी दिला.
कुंकळ्ळी मतदारसंघातील ओद्यौगिक वसाहतीमधील प्रदुषणाचा प्रश्न, राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरण व अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी कुंकळ्ळीचे नागरिकही उपस्थित होते.
आलेमाव म्हणाले, की कुंकळ्ळी ओद्यौगिक वसाहतीमधील फिश मिलमुळे तेथे प्रदुषण तयार होत आहे. यामुळे तेथील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर विषय आपण विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा प्रदुषणाचा विषय सोडवू असे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही सरकार दरबारी काहीच झालेले नाही. याविषयी आपण आता पर्यंत सरकारला सहा वेळा इशारा दिला आहे. मात्र त्याचीही दखल सरकारने घेतली नसल्याची टीका त्यांनी केली.