विरोधी आमदारांचं ठरलं, सरकारला घेरायचं! 'इंडिया' आघाडीची रणनीतीवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2024 12:50 PM2024-07-03T12:50:22+5:302024-07-03T12:50:57+5:30

इंडिया अलायन्समधील घटक पक्षांच्या आमदारांची संयुक्त बैठक झाली.

opposition mla discussion on the strategy of india alliance  | विरोधी आमदारांचं ठरलं, सरकारला घेरायचं! 'इंडिया' आघाडीची रणनीतीवर चर्चा

विरोधी आमदारांचं ठरलं, सरकारला घेरायचं! 'इंडिया' आघाडीची रणनीतीवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभेच्या येत्या पावसाळी अधिवेशनासाठी रणनीती ठरवण्यासाठी काल इंडिया अलायन्समधील घटक पक्षांच्या आमदारांची संयुक्त बैठक झाली.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ही बैठक बोलावली होती. यावेळी काँग्रेसचे आमदार कार्ल्स फेरेरा व एल्टन डिकॉस्टा, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, आम आदमी पक्षाचे दोन्ही आमदार वेंझी व्हिएगश व क्रुझ सिल्वा बैठकीला उपस्थित होते.

म्हादईच्या बाबतीत कर्नाटकने घेतलेली आक्रमक भूमिका व गोवा सरकारला केंद्राकडे हा विषय मांडण्यात आलेले अपयश, आसगाव येथील घर पाडल्याच्या प्रकरणात डीजीपींचा हात असल्याच्या आरोपामुळे लोकांचा पोलिसांवरील उडालेला विश्वास, बिघडलेली कायदा सुव्यवस्था, वाढती महागाई व बेरोजगारी यासह विविध विषयांवर विरोधी आमदार सरकारला धारेवर धरणार आहेत.

गेल्या विधानसभा अधिवेशनावेळी आरजीचे आमदार वीरेश बोरकर हेही या गटात होते; परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आरजी इंडिया आघाडीपासून दूर राहिली. विधानसभेतील भूमिकेबाबत आमदार बोरकर किंवा आरजीने अद्याप काही स्पष्ट केलेले नाही.

प्रश्न विचारण्याची संधीच नाही : सरदेसाई

बैठकीनंतर 'लोकमत'शी बोलताना विजय सरदेसाई म्हणाले की, विरोधकांना प्रश्न विचारण्याची संधीच दिली जात नाही, त्यावर आमची नाराजी आहे. पूर्वी एक प्रश्न विरोधी आमदाराचा, तर एक सत्ताधारी आमदाराचा असा घेतला जात असे. आता पहिल्या सहा प्रश्नांमध्ये एकाही विरोधी आमदाराला संधी दिली जात नाही. हा विषय आम्ही कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मांडणार आहोत. सरकार विरोधी आमदारांना तोंड द्यायला घाबरते हे यावरून स्पष्ट होते. ते म्हणाले की, गोव्यातील ज्वलंत विषय आम्ही मांडणार आहोत. काही खासगी ठरावही आणू, १२ रोजी पुन्हा आढावा बैठक घेऊ.
 

Web Title: opposition mla discussion on the strategy of india alliance 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.