खासदारांच्या निलंबनाविरोधात विरोधी पक्षांकडून सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2023 05:06 PM2023-12-22T17:06:33+5:302023-12-22T17:06:54+5:30
पणजीतील आझाद मैदानावर निदर्शने.
नारायण गावस, पणजी: देशातील १४६ खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ गोवा प्रदेश काँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, आप तसेच शिवसेना या विरोधी पक्षांकडून केंद्रीय भाजप सरकारच्या कृत्याचा निषेध करण्यात आला. येथील आझाद मैदानावर सर्व विरोधी पक्ष एकत्र येत भाजपच्या मक्तेदारी विरोधात निदर्शने केली. तसेच भाजपला येत्या लोकसभेत धडा शिकविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते आमदार युरी आलेमाव, आमदार ॲड. कार्लुस आल्मेदा, आमदार एल्टन डिकोस्टा, आपचे समन्वयक ॲड. अमित पालेकर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जुझे फिलीप तसेच इतर नेते उपस्थित होते.
यावेळी गोवा प्रदेश काँग्रेसचे अमित पाटकर, म्हणाले भाजपला पराभव आता दिसत आहे म्हणून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारकडे विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी काहीच नसल्याने असे खासदारांना निलंबित केले जात आहे. भाजपने कितीही हुकुमशाही केली तरी जनतेचा आवाज दाबला जाणार नाही आता इंडिया आघाडी एकत्र आली असून येणाऱ्या २०२४ च्या लोकसभेत भाजपला धडा शिकविला जाणार आहे.
भाजपकडून लोकशाहीचा खून :युरी आलेमाव : विरोधी पक्षनेते
भाजप सरकारने हुकूमशाही सुरु केली आहे. लोकांना जातीय वादावर भेदभाव करुन राजकारण केले जात आहे. हे सरकार लोकशाही मानत नाही. लोकशाहीचा खून केला जात आहे. आज सरकारविरोधात बोलले जात असल्याने राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन केले पण त्यांचे विचार दहन करु शकत नाही. कॉँग्रेसने देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणले आहे. गोव्यातही भाजप सरकारकडून हुकूमशाही केली जात आहे. जनतेला विश्वासात घेतले जात नाही.
अमित पाटकर : आप समन्वयक
लोकशाहीच्या आधारे प्रश्न विचारल्यावर खासदारांना बाहेर काढले जात आहे. म्हणजे विरोधकांना सरकारला विचारायचा अधिकार नाही का? येत्या २०२४ मध्ये भाजपला पराभूत होण्याची भीती वाटत आहे. विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. ही भाजपची हुकूमशाही आहे. आमचा या विरोधात आवाज सुरुच असणार आहे. हे आंदोलन देशभर सुरुच आहे.
जुझे फिलीप : राष्ट्रवादी काँग्रेस
हे सरकार विभाजन करुन राजकारण करत आहे आता आम्हाला सर्व विरोधकांना एकत्र येणे गरजेचे आहे. जर हे भाजप सरकार असेच हुकूमशाही करत असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात लढा सुरुच ठेवणार आहोत. या सरकारला विरोधकांचा आवाज दाबायला दिला जाणार नाही. तसेच लोकशाही नष्ट करायला दिली जाणार नाही.