वेर्ला-काणका ग्रामसभेत डीपीआरला विरोध; ठराव मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 02:48 PM2023-02-28T14:48:23+5:302023-02-28T14:50:15+5:30
म्हादई नदीचा मुद्दा वेर्ला-काणका पंचायतीच्या रविवारी झालेल्या ग्रामसभेत गाजला.
म्हापसा : म्हादई नदीचा मुद्दा वेर्ला-काणका पंचायतीच्या रविवारी झालेल्या ग्रामसभेत गाजला. म्हादईचे पाणी वळवण्यास विरोध करण्याचा ठराव मंजूर करून घेताना म्हादई वन्यजीव अभयारण्य तसेच वाघ्र अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात यावा, अशी मागणी करणारा ठराव एकमताने मंजूर करून घेण्यात आला.
म्हादईचा मुद्दा ग्रामसभेत उपस्थित करून ग्रामस्थांनी हा ठराव एकमताने मंजूर करून घेतला. केंद्र सरकारने कर्नाटकाला कळसा-भांडीरा येथे प्रकल्पासाठी दिलेली मंजुरी (डीपीआर) मागे घेण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. परवानगी मिळाल्यास तेथील नैसर्गिक न्यायाचे संरक्षण होणार नसल्याचेही मत व्यक्त करण्यात आले. तसेच म्हादई व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्याची मागणी गोवा सरकारकडे करण्याचा ठराव मंजूर करून घेण्यात आला.
ग्रामस्थ लिंकन ब्रागांझा यांनी म्हादई संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी सह्यांची मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती दिली. ही प्रत मुख्यमंत्री तसेच सरकारातील संबंधित मंत्र्यांना आंदोलनात सहभागी असलेल्या संघटनांना सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
भाडेकरू पडताळणीच्या संदर्भात ग्रामस्थांनी मुद्दा उपस्थित केला. भाडेकरूंची तपासणी आणि सर्वेक्षण करण्यासाठी पोलिस निरीक्षकांना सूचित करण्यात आले होते. यावर बोलताना सचिवांनी पोलिसांकडून या संदर्भात अद्यापही माहिती प्राप्त झाली नसल्याचे सांगितले. त्यावर पंचायतीकडून पाठपुरवठा झाल्या नसल्याबद्दल ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
ग्रामस्थांनी ग्रामीण पायाभूत पंचायत योजनेबाबतही मुद्दा उपस्थित केला. ग्रामस्थांनी या संबंधीचा सविस्तर अहवाल सादर करण्याची मागणी पंचायतीकडे केली. यावर सरपंचांनी दिन दयाळ योजनेंतर्गत पंचायतीकडून समाज सभागृहाची उभारणी करण्यास पावले उचलण्यात आल्याची माहिती दिली.
वेर्ला काणका ते खोल दरम्यान रस्त्याच्या कडेला टाकला जाणाऱ्या कचऱ्याचा मुद्याही यावेळी उपस्थित झाला. या कचऱ्याला आग लावून त्याची विल्हेवाट लावली जात असल्याचे सरपंचांनी निदर्शनाला आणून देतात या व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावी, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. वेर्ला काणका गावातील जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनाही आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले. सांडपाण्याच्या समस्येवर पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या समस्येवर सभेत चिंता व्यक्त करण्यात आली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"