सनबर्नला दक्षिणेत वाढू लागला विरोध; वेळसांवसह चार ग्रामसभांनी केले ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2024 08:24 AM2024-07-22T08:24:09+5:302024-07-22T08:24:46+5:30
दक्षिणेत अन्य ग्रामपंचायतींमध्येही सनबर्नला विरोध केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सनबर्नला दक्षिण गोव्यात होत असलेल्या विरोधाचे पडसाद आता ग्रामसभांमध्येही उमटत आहेत. काल वेळसांव ग्रामसभेत संतप्त ग्रामस्थांनी या ईडीएमला जोरदार विरोध करीत आम्हाला सनबर्न नकोच, असा ठराव घेतला. दक्षिणेत अन्य ग्रामपंचायतींमध्येही सनबर्नला विरोध केला आहे.
वागातोर येथून दक्षिण गोव्यात हलवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. डिसेंबरमध्ये २८ ते ३० या काळात तो होणार असून त्यासाठी येत्या २४ पासून या ऑनलाइन तिकीट विक्रीही सुरू केली जाणार आहे. यंदाचा सनबर्न आगळावेगळा असेल. लोकांना पाण्याखालच्या जगाची सफरही घडवून आणू, असे कंपनीने जाहीर केले आहे. दक्षिण गोव्यातील नेमके ठिकाण घोषित केले नसले तरी तो किनाऱ्यावरच होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे किनारी ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थ अधिक सतर्क झाले आहेत. ईडीएम, ड्रग्समुळे सनबर्न कलंकित आहे. यापूर्वी या ईडीएममध्ये अमली पदार्थांच्या अती सेवनामुळे मृत्यू होण्याच्याही घटना घडलेल्या आहेत. आपल्या गावात ड्रग्स येऊ नयेत म्हणून ग्रामस्थ जागरुक झाले आहेत व त्यातून हा विरोध होत आहे.
वागातोरला या ईडीएमचे आयोजन केले जायचे, तेव्हा प्रत्येक वेळेला या भागात मोठी वाहतूक कोंडी होवून त्याचा स्थानिकांना त्रास होत असे. लहान व्यावसायिकांचा धंदाही बुडायचा. सुमारे एक लाखाहून अधिक लोक या ईडीएमला उपस्थिती लावत असतात. अशी वाहतूक कोंडीही दक्षिण गोव्यातील लोकांना गावांमध्ये नकोय. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, नवनिर्वाचित खासदार विरियातो फर्नांडिस, आपचे आमदार वेंझी व्हिएगश व क्रुझ सिल्वा तसेच इतरांनी दक्षिणेत सनबर्न नकोच, अशी भूमिका घेत विरोध केला आहे.
ग्रामसभेत उमटले तीव्र पडसाद
वेळसांव पाळी इर्सोशी पंचायतीत रविवारी ग्रामसभेत उपस्थितांनी दक्षिण गोव्यात सनबर्न फेस्टिव्हलला विरोध करणारा ठराव एकमताने मंजूर केला. ग्रामसभेने कोकणी रोमन लिपीला समान दर्जा देण्याच्या ठरावाला उपस्थितांनी एकमताने मान्यता दिली. याबाबत पंच जीम डिसोझा यांनी पंचायतीत विविध ठराव सर्वानुमते मंजूर केल्याची माहिती दिली.
वेळळी, बाणावली, आंबेलीतूनही विरोध
सासष्टीतील वेळ्ळी, बाणावली, आंबेली या पंचायतींच्या रविवारी (दि.२१) झालेल्या ग्रामसभेत दक्षिण गोव्यात सनबर्न फेस्टिव्हलला विरोध करणारा ठराव एकमताने मंजूर केला. तसेच कोंकणी रोमन लिपीला समान दर्जा देण्याच्या ठरावालाही मान्यता देण्यात आली. हे दोन्ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. आंबेलीचे सरपंच आलेक्झांडर डिसिल्वा यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. बाणावलीचे सरपंच झेवियर परेरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत सनबर्न महोत्सवाला विरोध तसेच रोमी कोकणी लिपीला समानदर्जा प्राप्त करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. वेळळी पंचायतीच्या ग्रामसभेतही सनबर्नला विरोध करून रोमी कोकणी लिपीला समान दर्जा देण्याचा ठराव मंजूर केला.