उपसभापतींच्या मुलाविरोधात एफआयआर नोंदविण्याचा आदेश द्या, राज्यपालांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 10:09 PM2020-06-23T22:09:28+5:302020-06-23T22:10:04+5:30
रेमंड याने सादर केलेली बीए पदवी बोगस असल्याचे आढळून आल्यानंतर उत्तर गोवा जिल्हाधिका-यांनी १६ जून रोजी त्याची निवड रद्द केली.
पणजी : गोव्याचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचे पुत्र रेमंड याच्याविरुद्ध कारकून पदासाठी बोगस बीए पदवी प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल गुन्हा नोंदवून कारवाई केली जावी, अशी मागणी समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी मंगळवारी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन केली.
रेमंड याने सादर केलेली बीए पदवी बोगस असल्याचे आढळून आल्यानंतर उत्तर गोवा जिल्हाधिका-यांनी १६ जून रोजी त्याची निवड रद्द केली. उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकून पदाच्या १६ जागांसाठी जी निवड झाली होती त्यात रेमंड याचा समावेश होता. उर्वरित १५ जणांना सवेत रुजू करुन घेण्यात आले. बोगस पदवी प्रकरणात निवड होऊनही त्याच्याविरोधात अजून एफआयआर नोंद झालेला नाही. याकडे राज्यपालांचे लक्ष वेधण्यात आले.
रेमंडविरुध्द कठोर कारवाई केल्यास इतरांनाही संदेश जाईल आणि भविष्यात शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या बाबतीत खोटारडेपणा करण्याचे किंवा बोगस प्रमाणपत्रे सादर करण्याचे धाडस कोणी करणार नाही. आयरिश यांनी राज्यपालांना अशी विनंती केली आहे की, सरकारी खात्यांमध्ये भरतीच्यावेळी शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत अशी बोगस प्रमाणपत्रे उमेदवारांनी सादर करु नये यासाठी ती अत्यंत जबाबदारीने तपासण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे आदेश खातेप्रमुखांना द्यावेत, अशी मागणीही आयरिश यांनी केली आहे.