पंचायत कार्यालयातील मनमानी कारभार आळा घालण्यासाठी नागरिकांनी ठोकले पंचायत कार्यालयाला टाळे
By काशिराम म्हांबरे | Published: December 18, 2023 03:48 PM2023-12-18T15:48:33+5:302023-12-18T15:49:06+5:30
वेर्ला-काणका पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी कार्यालयाच्या गेटला टाळे ठोकण्याचा प्रकार आज घडला.
काशीराम म्हांबरे ,म्हापसा: पंचायत कार्यालयातील सचिवांचा मनमानी कारभार तसेच नागरिकांच्या सेवेसाठी सचीव वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या कारणास्तव शिवोली मतदार संघातील वेर्ला-काणका पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी कार्यालयाच्या गेटला टाळे ठोकण्याचा प्रकार आज घडला.
पंचायतीचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सरपंच आरती च्यारी यांनी पंचायतीकडून स्थापन केलेल्या विविध समित्यांची बैठक कार्यालयात बोलावली होती पण सचीव निकिता परब गैरहजर राहिल्याने बैठक स्थगीत करणे भाग पडल्याची माहिती च्यारी यांनी दिली.
पंचायत क्षेत्रातील विविध विकास आराखडे तयार करुन १९ डिसेंबर पर्यंत गट विकास कार्यालयात सादर करणे अत्यावश्यक होते. सचिवांच्या अनुपस्थितीत बैठक स्थगीत करणे भाग पडल्याने पंचायतीच्या विकासावर परिणाम होणार असल्याचे ही सरपंच म्हणाल्या.
सप्टेंबर महिन्यात पंचायतीच्या सचिव पदाचा ताबा घेतल्यानंतर सचीव सतत गैरहजर होता. सचीव उपलब्ध होत नसल्याने पंचायतीच्या कामकाजावर परिणाम झालेला. नागरिकांना वेळेवर दाखले उपलब्ध होत नसल्यानेत्यांना माघारी जावे लागत होते. गेल्या महिन्यात पंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेतून सचीव सभा अर्धवट सोडून गेल्याने सभा स्थगित करावी लागली होती. सचिवांच्या या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी कार्यालयाच्या मुख्य गेटवर टाळे ठोकण्यात आल्याची माहिती नागरिक ऐश्वर्या साळगांवकर यांनी दिली.