गोवा आयडीसी तर्फे २१ रोजी ओएनडीसीबाबत कार्यशाळेचे आयोजन

By समीर नाईक | Published: May 18, 2024 03:06 PM2024-05-18T15:06:17+5:302024-05-18T15:06:28+5:30

ओएनडीसी हे केवळ एखादे मोबाईल एप्लिकेशन नाही, बाजारातील मध्यस्थ नाही किंवा सॉफ्टवेअर म्हणून कार्यरत नाही.

Organized workshop on ONDC by Goa IDC on 21st | गोवा आयडीसी तर्फे २१ रोजी ओएनडीसीबाबत कार्यशाळेचे आयोजन

गोवा आयडीसी तर्फे २१ रोजी ओएनडीसीबाबत कार्यशाळेचे आयोजन

पणजी:  गोवा औद्योगिक विकास महामंडळ (गोवा-आयडीसी)द्वारे राबवण्यात येत असलेल्या आयडीसी-कनेक्ट २०२४ या उपक्रमाअंतर्गत वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) या शासकीय खरेदी-विक्री प्लॅटफॉर्मबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यशाळा २१ मे रोजी फर्न केसरवाल, वेर्णा येथे होणार आहे. विनामूल्य असलेली ही कार्यशाळा गोवा-आयडीसीच्या वसाहतीमधील सर्व उद्योगांसाठी खुली आहे. 

ओएनडीसी कार्यशाळेचा उद्देश सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी डिजिटल कॉमर्सच्या माध्यमातून क्रांती घडवून आणणे हा आहे. या कार्यशाळेत व्यावसायिक कामकाज प्रभावीपणे कसे करावे, डिजिटल मार्केटप्लेसमध्ये सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांच्या सहभागामधील आव्हानांवर कशी प्रकारे मात करता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

भारतामध्ये मुक्त ई-व्यापार पद्धतीचा प्रसार करणे आणि ई-व्यापार प्रणाली लोकशाही तत्वावर कार्यरत राहण्याचे सुनिश्चित करणे या उद्देशाने भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी)द्वारे ओएनडीसी ही खाजगी, ना-नफा तत्वावर कार्यरत सेक्शन-८ कंपनी स्थापन करण्यात आली आहे. ओएनडीसी हे केवळ एखादे मोबाईल एप्लिकेशन नाही, बाजारातील मध्यस्थ नाही किंवा सॉफ्टवेअर म्हणून कार्यरत नाही. तर विविध छोटे-मोठे उत्पादक, वितरक, व्यावसायिक, किरकोळ विक्रेते यांच्या दरम्यान मुक्त व्यावसायिक देवाणघेवाण करण्याबाबत आणि या बाजारघटकांमध्ये एक दुवा बनण्यासाठी विशिष्ट कार्यप्रणालींचा संच म्हणजे ओएनडीसी आहे. सर्वसमावेशक ई-कॉमर्स परिसंस्था तयार करण्याच्या उद्देशाने ओएनडीसीची स्थापना करण्यात आली आहे.

आयडीसी-कनेक्ट २०२४च्या माध्यमातून या कार्यशाळेच्या आयोजनाबाबत उत्साह व्यक्त करताना गोवा-आयडीचे व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक म्हणाले, “उद्योगांना भूखंड उपलब्ध करणारी संस्था अशी भूमिका मर्यादित न ठेवता, गोवा राज्याचा औद्योगिक आणि आर्थिक विकास साधण्यासाठी एक प्रेरक म्हणून काम करण्यासाठी गोवा-आयडीसी कटिबद्ध आहे. ई-कॉमर्स प्रणालीतून बाजारातील नवनव्या संधी उपलब्ध करत ओएनडीसी प्लॅटफॉर्म गोव्यातील सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांसाठी व्यवसायाचा पूर्ण परिपेक्ष बदलवून टाकणारा असा ठरू शकतो. या कार्यशाळेचा गोव्यातील अनेक उद्योग-व्यवसायांना लाभ होईल असा मला विश्वास आहे.
 गोवा-आयडीसीच्या वसाहतींमधील सर्व उद्योगांना अशा सुविधांचा लाभ मिळावा या हेतूने गोवा-आयडीसीद्वारे यंदा अशा आणखी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे असेही प्रविमल अभिषेक यांनी सांगितले.

Web Title: Organized workshop on ONDC by Goa IDC on 21st

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.