गावस्कर, वेंगसरकर आदी क्रिकेटपटूंचे मूळ गोव्यातच, मुख्यमंत्री पर्रििकर यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 06:57 PM2017-09-29T18:57:01+5:302017-09-29T18:57:20+5:30
सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर आदी कर आडनावाचे जे मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत त्यांचे मूळ गोव्यातच आहे. ते गोमंतकीयच ठरतात. त्यांचा जन्म गोव्यात झाला नाही तरी जिनेटीकली तरी ते गोमंतकीयच आहेत, असे मत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी येथे मांडले.
पणजी - सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर आदी कर आडनावाचे जे मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत त्यांचे मूळ गोव्यातच आहे. ते गोमंतकीयच ठरतात. त्यांचा जन्म गोव्यात झाला नाही तरी जिनेटीकली तरी ते गोमंतकीयच आहेत, असे मत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी येथे मांडले. पोर्तुगीज राजवट गोव्यात होती त्यावेळी अनेक गोमंतकीय गोवा सोडून देशात अन्यत्र गेले व स्थायिक झाले. कर आडनावाचे जे कुणी देशात सापडतात ते सगळे मूळ गोमंतकीय आहेत असे पर्रीकर म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार राजदिप सरदेसाई यांचे वडिल असलेले क्रिकेटपटू स्व. दिलीप सरदेसाई हे गोमंतकीय होते. त्यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात शुक्रवारी पर्रीकर बोलत होते. राजदिप सरदेसाई यावेळी व्यासपीठावर होते. आपल्या वडिलांनंतर एकही पुरूष गोमंतकीय भारतीय क्रिकेट संघात पोहचला नाही अशी खंत सरदेसाई यांनी व्यक्त केली होती. त्याला पर्रीकर यानी वरील उत्तर दिले. राजदिप सरदेसाई हे मुंबई व अन्यत्र वाढल्यामुळे त्यांना ठाऊक नाही पण गावसकर, वेंगसरकर असे अनेकजण मूळचे गोमंतकीय आहेत असे पर्रीकर म्हणाले. दरम्यान स्व. दिलीप सरदेसाई स्मृती पुरस्कार सरकारकडून यावेळी आंतरराष्ट्रीय तायक्वांडोपटू पी. आनंद यांना प्रदान करण्यात आला. रोख रूपये दोन लाख व चषक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.