गोव्यात वैद्यकीय पर्यटन धरतेय मूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 03:42 AM2017-12-25T03:42:57+5:302017-12-25T03:43:21+5:30
वर्षाला ६० लाख पर्यटक देणा-या गोव्यात आता वैद्यकीय पर्यटनही हळूहळू मूळ धरू लागले आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयानेही त्याच दृष्टिकोनातून गोवा सरकारच्या सहकार्याने काही प्रकल्पांचे नियोजन
सद्गुरू पाटील
पणजी : वर्षाला ६० लाख पर्यटक देणा-या गोव्यात आता वैद्यकीय पर्यटनही हळूहळू मूळ धरू लागले आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयानेही त्याच दृष्टिकोनातून गोवा सरकारच्या सहकार्याने काही प्रकल्पांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. विदेशी पर्यटकांची मोठी संख्या लक्षात घेता या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत.
१० वर्षांपूर्वी गोव्यात केवळ वीस-बावीस स्पा होते. आता त्यांची संख्या दीडशेपेक्षा जास्त झाली आहे. पंधरा वर्षांपूर्वी गोव्यात केवळ तीन-चार योग केंद्रे असायची. आता तीसपेक्षा जास्त योग केंद्रे आहेत. किनारपट्टी भागांमध्ये विदेशी पर्यटक योग, प्राणायाम करतात. गोव्यात राष्ट्रीय नॅचरोपथी संस्था उभी करावी, असे केंद्रीय आयुष मंत्रालयाने ठरविले आहे. त्यासाठी पेडणे तालुक्यात जमीनही घेतली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. पर्यटनाची सांगड वैद्यकीय क्षेत्राशी घालावीच लागेल. त्यातून अधिक रोजगार संधी निर्माण होतील. गोमंतकीयांना रोजगार मिळेल. वैद्यकीय पर्यटन विकसित होण्यासाठी वेळ लागेल, असेही राणे म्हणाले.
केंद्रीय आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक हे गोव्याचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांनाही वैद्यकीय पर्यटन विकासात अधिक रस आहेत. आयुर्वेदामध्ये विदेशी पर्यटकांना खूप रस आहे. गोव्यात आयुर्वेदाचा प्रसार यापुढे अधिक होणार आहे. राष्ट्रीय नॅचरोपथी संस्था आम्ही उभी करूच; शिवाय आयुर्वेद आणि नॅचरोपथी यांचे संशोधन केंद्रही उभे करणार आहोत. आयुष मंत्रालयाची दोन इस्पितळेही उत्तर व दक्षिण गोव्यात साकारणार आहोत, असे नाईक यांनी सांगितले.