...अन्यथा पाचव्या मजल्यावरून उडी टाकेन; त्याच्या हट्टीपणामुळे आरोग्य यंत्रणांची दमछाक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 06:08 PM2020-04-09T18:08:07+5:302020-04-09T18:10:12+5:30
चांगले सुशिक्षितही आहेत. परंतु हे काही सुशिक्षित डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करायचे सोडून एक सारखे 'घरी सोडा' असा पाढाच वाचतात.
-वासुदेव पागी
पणजीः मला घरी सोडले नाही तर पाचव्या मजल्यावरून उडी घेईन, अशा सरळ सरळ पोलिसांना धमक्या देणाऱ्या कोरोनाच्या संशयितांना क्वॉरन्टाईनमध्ये ठेवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. मडगाव रेसिडेन्सीत अनेक संशयित रुग्णांना क्वॉरन्टाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. विदेशात व राज्याबाहेर प्रवास केलेल्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. चांगले सुशिक्षितही आहेत. परंतु हे काही सुशिक्षित डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करायचे सोडून एक सारखे 'घरी सोडा' असा पाढाच वाचतात.
एका विदेशात जाऊन आलेल्या माणसाने तर त्याला ठेवण्यात आलेल्या पाचव्या मजल्यावरून खाली उडी टाकण्याची धमकीही दिली. त्याला समजावण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली. त्याच्या नातेवाईकांच्या हातापाया पडून त्याला समजवावे लागले, अशी माहिती दक्षिण गोवा आरोग्य यंत्रणांच्या सूत्रांकडून देण्यात आली. दुसरी एक विदेशी महिला होती. संशयित म्हणून इस्पितळात दाखल करून ठेवण्यात आले होते. नर्स व इतर कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पळत सुटली. शेवटी पोलीसांची मदत घेऊन शोधून आणावे लागले.
वास्को येथील कोटेज इस्पितळातही बऱ्याच संशयितांना ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणीही अशाच करामती होत असल्याची माहिती आहे. घरी जायला द्यावे म्हणून डॉक्टरना कहाण्या रचून सांगण्याचे प्रकार होत आहेत. या ठिकाणी जेवणाची व्यवस्थासारखी नाही असे म्हणून घरी जातो असेही दोघांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगितले. या सर्वांना हाताळण्यासाठी यंत्रणांची दमछाक होत आहे.