...तर भाजप सरकारविरुद्धही आंदोलन करा; विनोद तावडेंचा अभाविप कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 12:59 PM2023-07-10T12:59:48+5:302023-07-10T13:01:10+5:30
पणजीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परिषदेच्या ७५ व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजप सरकारच्या एखाद्या चुकीच्या निर्णयाविरोधात आंदोलन करायला कधीही कचरू नका, मग सरकार कुणाचेही असू दे,' असा संदेश भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी दिला. पणजीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परिषदेच्या ७५ व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.
अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे, आंदोलन करणे हे परिषदेचे कामच असल्याचे त्यांनी सांगितले. अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या अभाविपच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे या नात्याने निमंत्रित असलेले तावडे हे अभाविपचे माजी प्रदेश मंत्रीही आहेत. अभाविपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले, 'अभाविपचे काम हे कार्यकर्त्यांच्या कष्टातन आणि संघर्षातन उभे राहिले आहे. गोव्यातही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी परिषदेने अनेक आंदोलने इतिहासात केली आहेत. आजही एखाद्या मुद्यावर आंदोलन करण्याची गरज असेल तर ते परिषदेने करावेच सत्तेत कोणते सरकार आहे किंवा कोण मंत्री आहे याचा विचार न करता अन्यायाविरुद्ध आंदोलन करा. कुणाला काय वाटेल याची चिंता करण्याची गरज नाही. कारण तुम्ही एखाद्या व्यक्तीविरुद्ध नव्हे, तर विशिष्ट पदाधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन करीत आहेत. विद्यार्थी परिषदेचे काम हे आंदोलनांमुळेच वाढले आहे, असे तावडे यांनी सांगितले.
तावडे यांनी गोव्यातील विद्यार्थी परिषदेच्या कामाचे कौतुक करतानाच स्वत: प्रदेश महामंत्री असतानाच्या गोव्यातील कामांच्या आणि विशेषतः आंदोलनांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या आठवणी सांगितल्या. विद्यार्थी परिषदेच्या कामामुळेच तळागळातील लोकांचे जीवन जवळून पाहण्याची संधी आपल्याला मिळाली आणि त्यामुळेच देशात आरक्षणाची किती गरज आहे हे आपल्याला त्यावेळी पटले, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी परिषदेचे अनेक माजी कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार संकल्प आमोणकर, एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर, दत्ता नाईक, निलांगी शिंदे, अजितसिंग राणे, अॅड. प्रवीण फळदेसाई, माहिती आयुक्त विश्वास सतरकर, भूषण भावे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. विभाग संयोजक धनश्री मांद्रेकर, राष्ट्रीय महासचिव अंकिता पवार, विभागप्रमुख विलास सतरकर, वैभव शहरमंत्री यांचीही यावेळी भाषणे झाली.
भाजपचे डिपॉझिट जप्त होते तेव्हा....
गोव्यात विद्यार्थी परिषदेचे काम हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे उभे राहिले असून कोणतेही सरकार किंवा पक्ष याचा त्यात काही संबंध नाही आहे. जेव्हा गोव्यातील निवडणुकीत भाजप उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होत होती, त्यावेळी गोवा विद्यापीठावर विद्यार्थी परिषदेचा झेंडा फडकत होता, असे प्रा. दत्ता नाईक यांनी यावेळी सांगितले. सावईकर, शिंदे व इतर माजी कार्यकर्त्यांनीही परिषदेच्या आंदोलनांना उजाळा देणारे अनुभव कथन केले.