लोकांना सुविधा पुरवणे हेच आपले कर्तव्य: मंत्री सुभाष शिरोडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 09:44 AM2023-10-22T09:44:33+5:302023-10-22T09:45:14+5:30
शिरोडा येथे विकासकामांचे उद्घाटन, आमदार गणेश गावकर उपस्थित
लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : आवश्यक असलेल्या साधन सुविधा पुरवून समृद्ध गाव बनवण्यासाठी विकास करण्याबाबत पाऊल टाकले आहे. लोकांना आवश्यक साधन सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य असल्याचे सहकार खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
शिरोडा येथे श्री महामाया मंदिर सभा मंडपात आयोजित केलेल्या गावातील विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. गोवा पर्यटन विकास महामंडळ आणि शिरोडा ग्रामपंचायतीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमात धारबांदोडाचे आमदार गणेश गावकर तसेच जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, शिरोडा येथील पंचायतीच्या सरपंच पल्लवी शिरोडकर, शिरोडा भाजप मंडळाचे अध्यक्ष सुरज नाईक, शिवनाथ संस्थानचे अध्यक्ष राजू प्रभू गावकर, संजय गोयल, सर्वेश नाईक, किरण कुमार नाईक, माधव हेदे, डॉ. रामकृष्ण पारकर, आनंद खांडेपारकर, ख्रिस्तेव डिकॉस्ता आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
शिरोडकर पुढे म्हणाले, गावातील तलावाचा विकास करून कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन वाढवण्यावर व शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शनाखाली विश्वकर्मा योजना मतदारसंघात राबवण्यात राबवली जाणार आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार गणेश गावकर म्हणाले, शिरोडकर यांनी मतदारसंघात विकासकामे पूर्ण करण्यावर भर दिल्यामुळे अनेक विकासकामे घडू लागली आहेत. शिरोडा मतदारसंघात विकासकामांमध्ये सुभाष शिरोडकर यांचे मोलाचे योगदान आहे. यावेळी नारायण कामत यांनीही याप्रसंगी आपले विचार मांडले.
सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते महामाया मंदिर परिसर आणि श्री रवळनाथ परिसर केलेल्या सौंदर्यीकरणाच्या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. या कामांमध्ये सहकार्य केलेले कोमुनिदादचे माधव हेदे आणि डॉ. रामकृष्ण पारकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात पल्लवी शिरोडकर यांनी स्वागत केले तर शिरोडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आनंद खांडेपारकर यांनी आभार मानले.