मोदी सरकारला दरवर्षी आमचे रिपोर्ट कार्ड सादर, मुख्यमंत्र्यांकडून माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 09:35 PM2021-02-15T21:35:42+5:302021-02-15T21:36:17+5:30
वृत्त वाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केले. प्रत्येक मंत्र्याचे रिपोर्ट कार्ड तयार होत असते. दर वर्षी केंद्र सरकार प्रत्येक भाजप सरकारकडून रिपोर्ट कार्ड घेत असते असे मुख्यमंत्री म्हणाले.
पणजी : केंद्रातील मोदी सरकार दरवर्षी आमचे रिपोर्ट कार्ड घेत असते. यापुढे माझ्या सरकारचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होईल तेव्हा देखील रिपोर्ट कार्ड सादर होणार आहे. प्रत्येक राज्यातील भाजप सरकारकडून केंद्र सरकार रिपोर्ट कार्ड घेतेच, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी येथे सांगितले.
वृत्त वाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केले. प्रत्येक मंत्र्याचे रिपोर्ट कार्ड तयार होत असते. दर वर्षी केंद्र सरकार प्रत्येक भाजप सरकारकडून रिपोर्ट कार्ड घेत असते असे मुख्यमंत्री म्हणाले. पुढील विधानसभा निवडणुकीसाठी मला भाजपने आपला चेहरा म्हणून जाहीर केले याविषयी मला आनंद वाटतो. भाजपची मते वाढण्यास ते मदतरुप ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
दहा हजार नोकऱ्या शक्य
दहा हजार नोकऱ्या देणे गरजेचे आहे कारण प्रशासनाची ती गरज आहे. अनेक पदे रिकामी आहेत. येत्या डिसेंबर व जानेवारीपर्यंत आणखी अनेकजण सेवेतून निवृत्त होतील, तोपर्यंत दहा हजार व्यक्तींना नोकऱ्या मिळालेल्या असतील असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. नोकर भरतीमुळे सरकारी तिजोरीवर थोडा भार पडेल पण यापुढे स्थिती सुधारणार आहे असे ते म्हणाले. स्वयंपूर्ण गोवा निश्चितच शक्य आहे. राज्यात भाज्यांचे, फुलांचे व दुधाचे उत्पादन वाढत आहे. मी आमदार झालो तेव्हापासून गोवा राज्य स्वयंपूर्ण व्हावे असा विचार करतोय. सरकारच्या सर्व योजना सामान्य लोकांपर्यंत पोहचायला हव्या. राज्यात १९ हजार विशेष व्यक्ती आहेत. अडिच हजार व्यक्तींपर्यंत आम्ही मोफत उपकरणे पोहचवली. पुढील वर्षभरात सर्व १९ हजार विशेष व्यक्तींपर्यंत साहित्य पोहचेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्र सरकारने जे तीनशे कोटी रुपये दिले, त्यापैकी प्रत्येकी एक कोटी रुपये पालिकांनाही दिले जातील. पंचायतींना एकूण १०० कोटी दिले जातील. गोव्यातील सामान्य माणसालाही मदत करण्याचा विचार आहे. गोवा मुक्तीची साठ वर्षे साजरी करताना स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केला जाईल. स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकांचे नूतनीकरण करण्यासाठी खर्चाचे आराखडे तयार होऊ लागले आहेत. गोवा मुक्तीच्या इतिहासाबाबत वस्तूसंग्रहालय देखील साकारणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.