फोंडा नगरपालिकेत आमचेही बारा उमेदवार सहज निवडून येतील: केतन भाटीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 12:33 PM2023-05-05T12:33:58+5:302023-05-05T12:35:40+5:30
विद्या पुनाळेकर यांना राजीनामा द्यायला सांगून निवडणुकीत विजयी करून दाखवावे.
लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : फोंडा नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी एका बाजूने भाजप साम- दाम-दंड वापरत असताना रायझिंग फोंडाचे केतन भाटीकर मात्र निश्चिंत असून ते म्हणतात त्यांचे बाराच्या बारा उमेदवार विक्रमी मताधिक्याने निवडून येतील.
'लोकमत' शी बोलताना ते म्हणाले की, भाजपने लोकांना वेगवेगळी आमिषे दाखवली आहेत. जी नैतिकतेमध्ये व निवडणुकीच्या आचारसंहितेत बसत नाहीत; परंतु मतदारांनी कधीचाच निश्चय केला आहे. मागची पाच वर्षे आम्ही लोकांच्या सेवेसाठी तत्पर आहोत. लोकांना एक दिवसाचा राजा व्हायचे नाही. पाच वर्षे कुठली व्यक्ती त्यांच्याकरिता धावून येईल, याचा विचार मतदार करत आहेत.
आम्ही रायझिंग फोंडा मात्र नव्या जोमाने लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहिलो आणि हे लोकांच्या नजरेतून सुटलेले नाही. काही ठिकाणी आमचे उमेदवार विक्रमी मताधिक्याने निवडून येणार आहेत तर, काही ठिकाणी ते जायंट किलरसुद्धा बनणार आहेत, यात मात्र काही शंका नाही.
दादा चांगले काम करत आहेत
प्रभाग चारमध्ये रायझिंग फोंडाचा उमेदवार नाही या संदर्भात डॉ. केतन भाटीकर म्हणतात की, फोंड्यातील कचरा निर्मूलनासाठी व्यंकटेश नाईक यांनी जे काम केले आहे त्याला तोड नाही. आज फोंडा स्वच्छ व सुंदर दिसत आहे. त्याचे सर्वाधिक श्रेय हे व्यंकटेश नाईक यांना जाते. अशा उमेदवाराच्या मागे उभे राहणे हे आमचे कर्तव्य असल्याने आम्ही त्या प्रभागात उमेदवार दिला नाही.
- भाजपने आमचा एक नगरसेवक कटकारस्थान करून पळवला. लाखो सदस्य असल्याचा दिंडोरा आज भाजप स्वतः पिटवत आहे.
- असे असताना त्यांना उमेदवार पळवण्याची गरज का भासली. हिम्मत असेल तर विद्या पुनाळेकर यांना राजीनामा द्यायला सांगून निवडणुकीत विजयी करून दाखवावे.