बाहेरच्या लोकांनी सत्तरी अशांत करू नये; म्हादईबाबत सर्वांमध्ये आधीपासूनच पुरेशी जागृती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 03:49 PM2023-02-22T15:49:13+5:302023-02-22T15:51:08+5:30
आरजीची पदयात्रा रोखल्याने तणाव निर्माण झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'सत्तरीबाहेरील लोकांनी येथे येऊन अशांतता माजवू नये. म्हादईच्या प्रश्नावर स्थानिक जागरूक आहेत,' असे पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी सुनावले आहे. आरजीने म्हादईच्या विषयावर सत्तरीत काढलेल्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर दिव्या राणे यांनी हे विधान केले आहे. आरजीची ही पदयात्रा रोखल्याने सोमवारी तणाव निर्माण झाला होता.
आमदार दिव्या म्हणाल्या की, 'सत्तरीत म्हादईबाबत कोणीही, कसलीही जागृती करण्याची गरज नाही. लोकांना विषय ठाऊक आहे. पदयात्रा काढण्यासाठी काल जे आले होते, ते सर्व जण सत्तरीबाहेरील होते. कोणीही स्थानिक त्यांच्याबरोबर नव्हता. गावात अशांतता नको, म्हणून स्थानिकांचा पदयात्रेला विरोध होता.
दिव्या राणे म्हणाल्या की, कोणताही विषय असू दे. सत्तरीतील लोक विश्वजित आणि माझ्या पाठीशी आहेत. लोकांशी आमचा संबंध आजकालचा नव्हे तर गेल्या ५० वर्षांचा आहे. सत्तरीवासीय आमच्यासाठी स्वतःच्या परिवाराप्रमाणेच आहेत. ते अडचणीत असले तर आम्हाला वेदना होतात आणि आम्ही अडचणीत असलो तर त्यांना दुःख होते. एवढे आमचे घनिष्ठ संबंध आहेत. म्हादई बाबतीत त्यांनी कोणीही बाहेरून येऊन शिकवण्याची गरज नाही.
शेळ, मेळावलीवासीयांना पश्चात्ताप होतोय
दरम्यान, आमदार दिव्या राणे म्हणाल्या की, 'शेळ मेळावली वासीयांना आयआयटीला विरोध केल्याचा आज पश्चात्ताप होत आहे. सरकारने प्रकल्प पुन्हा मेळावलीत आणल्यास आणि संधी दिल्यास स्थानिक लोक तो आनंदाने स्वीकारतील.' आयआयटीविरोधात मेळावलीवासीयांनी जोरदार आंदोलन केल्याने हा प्रकल्प तेथून गुंडाळावा लागला होता. आंदोलकांना अटक करून खटलेही भरले होते. सरकार हा प्रकल्प देऊ केलेली जमीन अपुरी असल्याने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ती जमीन नाकारली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"