‘मधुमेहाशी युद्ध पुकारा व्यायामाच्या जोरावर’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 02:30 PM2018-11-14T14:30:49+5:302018-11-14T14:38:29+5:30
मधुमेहाच्या (डायबीटीस) विळख्यातून स्वत:ला वाचविण्यासाठी व्यायामाच्या आधाराने मधुमेहाविरुद्ध युद्ध पुकारण्याचे आवाहन गोव्यातील प्रसिद्ध डायबेटीस तज्ज्ञ डॉक्टर तेजस कामा यांनी दिला आहे.
पणजी - मधुमेहाच्या (डायबीटीस) विळख्यातून स्वत:ला वाचविण्यासाठी व्यायामाच्या आधाराने मधुमेहाविरुद्ध युद्ध पुकारण्याचे आवाहन गोव्यातील प्रसिद्ध डायबेटीस तज्ज्ञ डॉक्टर तेजस कामा यांनी दिलं आहे. देशात पाच वर्षात मधुमेहींची संख्या दहा पटीने वाढली आहे.
मेडिकल असोसिएशनने बारदेशतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. कामत यांनी मधुमेहासंबंधी सविस्तर माहिती दिली. भारत हा लोकसंख्येप्रमाणेच मधुमेहींच्या बाबतीतही चीननंतर दुसऱ्या क्रमांकांचा देश ठरला आहे. त्यामुळे मधुमेहाविरुद्ध युद्ध पुकारण्याची ही वेळ आहे. पाच वर्षात दहापटीने रुग्णांची संख्या वाढणे हे काही भल्याचे संकेत नाहीत. गोव्यातही परिस्थिती वेगळी नाही. पूर्वी केवळ प्रौढवयात किंवा चाळीसी पार केल्यानंतर मधुमेह आढळून यायचा. आता तरुणांनाही मधुमेह होत असल्याचे आढळून येत आहे. शिवाय हा अनुवांशिक रोग बनल्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. केवळ मधुमेह झालेल्यांनी नव्हे तर न झालेल्यानींही मधुमेहाविरुद्धच्या युद्धात पूर्ण ताकदीनिशी उतरायची गरज आहे. केवळ प्रौढांनी नव्हे तर तरुणांनी व त्या खालील मुलांनीही सतर्क होण्याची ही वेळ आहे अशा शब्दात डॉ कामत यांनी परिस्थितीची जाणीव करून दिली आहे.
मधुमेह का होतो व कुणाला होऊ शकतो हे आता जवळ जवळ सर्वांना ठाऊक आहे. साखरेचे व तेलकट खाणे ही कारणे असली तरी मधूमेह हा स्वादुपिंड निकामी होण्याने किंवा ते कमजोर बनल्याने होत आहे हे लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे स्वादुपिंड चांगले ठेवण्यासाठी जे काही करावयाला हवे ते सर्व करण्याची गरज आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे नियमित किमान अर्धा तास तरी व्यायाम हा केलाच पाहिजे. त्यानंतर आहार व इतर गोष्टी येतात असे ते म्हणाले. एकदा का स्वादुपिंड कमजोर झाले की नंतर इन्सुलीन पुरेशा प्रमाणात तयार होत नाही. त्यामुळे मधुमेह होतो. मधुमेहामुळे मेंदु, डोळे, हृदय, यकृत, मूत्रपिंड आदी अवयवांचे विकार होण्याची अधिक शक्यता असते असे त्यांनी सांगितले. पत्रकारांसाठी मधुमेहासंबंधी तपासणी करण्याची इच्छा असल्याचे आर जे रुग्णालयाचे युरोसर्जन डॉ वर्धन भोबे यांनी यावेळी सांगितले व केव्हाही त्यासाठी काम करण्याची तयारी दर्शविली.