रामलल्लाच्या दर्शनाने भारावलो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2024 09:33 AM2024-02-02T09:33:02+5:302024-02-02T09:34:03+5:30

श्रीरामाचे पवित्र दर्शन घेऊन माझ्या हृदयातील रामभक्ती अधिकच तीव्र झाली.

overwhelmed by the sight of ram lalla | रामलल्लाच्या दर्शनाने भारावलो...

रामलल्लाच्या दर्शनाने भारावलो...

गोपाळ रामनाथ नाईक, म्हार्दोळ

'जय श्रीराम, जय जय श्रीराम' हा जयघोष या दिवसात क्षणोक्षणी माझ्या मुखातून इतक्या तीव्रतेने कसा निघतो याचे माझे मलाच खूप आश्चर्य वाटते. अयोध्येला जाऊन राम मंदिर बघण्याची कित्येक वर्षांची माझी सुप्त इच्छा २५ जानेवारीला पूर्ण झाली. श्रीरामाचे पवित्र दर्शन घेऊन माझ्या हृदयातील रामभक्ती अधिकच तीव्र झाली.

खरे तर माझ्या तनामनात श्रीराम वसलेला आहे. माझ्या दिवंगत वडिलांच्या नावातच राम आहे. कै. रामनाथ (बाबू) गोविंद नाईक हे माझे वडील, १९९२ साली गोव्यातून अनेक कारसेवक अयोध्येला कारसेवेसाठी गेले होते. त्यावेळचे तपोभूमीचे प्रमुख प.पू. ब्रह्मानंदस्वामी यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील अनेक गुरुबंधू अयोध्येला गेले होते. माझे वडीलही त्यात सामील झाले होते. त्यावेळी मी घरात चाललेली राम मंदिराविषयीची चर्चा ऐकायचो. तेव्हाच माझ्या मनात कुतूहलापोटी रामभक्ती रुजली असावी, त्यावेळी अयोध्येतील परिस्थिती, एकूण घडामोडी, १९९० सालच्या कारसेवेवेळी झालेला गोळीबार व कारसेवकांचा मेलेला बळी या विषयांनी माझ्या मनात घर केले होते. तेव्हाच मी मनाशी ठरविले होते की, ज्यावेळी अयोध्येत श्रीराम मंदिर बांधले आईल तेव्हा मी दर्शनासाठी जरूर जाईन. 

कोटी कोटी रामभक्तांच्या इच्छेने, आशीर्वादाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक परिश्रमामुळे शेवटी राम मंदिर बांधून झाले. २२ जानेवारी रोजी पंतारधार्नाच्याच हस्ते रामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली, तो अद्‌भूत सोहळा मी दूरदर्शनवर एकटक पाहिला, त्याचवेळी गोवा-दिल्ली व दिल्ली- अयोध्या हे विमानाचे तिकीट बुक केले. तिकडे काय परिस्थिती असेल, थंडी असेल का, गर्दीही असेल म्हणून मी प्रथम एकटेच जायचे ठरविले. २५ जानेवारीला सकाळी ६.३० वा. गोवा-दिल्ली विमानाने दिल्ली गाठले. दिल्लीहून ११.५५ ला अयोध्येसाठी विमानाने प्रयाण केले. दुपारी दीड वाजता अयोध्येत पोचलो.

आयुष्यात पहिल्यांदाच मी विमानात पूर्ण वेळ श्रीराम घोषणा अनुभवल्या, प्रत्येक प्रवासी जणू एका अ‌द्भुत ऊर्जेने भारलेला होता. विमानातल्या कर्मचा-यांनीही कुणालाच आडकाठी आणली नाही. तात्पर्य विमानात सगळे वातावरण राममय झाले होते. अयोध्येचा नवाकोरा विमानतळही सजला होता. 

विमानतळावरून शेअरींग टॅक्सीने मी निघालो. विमानतळ ते मंदिर हा तेरा किलोमीटरचा प्रवास छान वाटला, जागो जागी आरास, तोरणे, रामपताका, यांनी अयोध्यानगरी सजली होती. जागोजागी ध्वनीक्षेपकावरून रामनामाचा गजर सुरू होता. पूर्ण प्रवासात टॅक्सीवालाही आनंदाने अयोध्येत झालेल्या बदलासंबंधी बोलत होता, होणाऱ्या कमाईमुळे अयोध्येतील जनसामान्य बरेच खूश असल्याचेही त्याने सांगितले.

दुपारी २ वाजता मी मंदिर परिसरातल्या धर्मशाळेत पोहोचलो. मनात खूप भावना दाटून आल्या होत्या, पवित्र भूमीवर पाय ठेवताच धन्य झाल्यासारखे वाटले. मंदिराचा एकूणच परिसर खूप सुरेख आणि सुंदर आहे. अडिच वाजता दर्शनासाठी असलेल्या रांगेत उभा राहिलो. जवळ जवळ ५ वा. मला श्रीरामाचे दर्शन झाले. मंदिरात मोबाईल किंवा इतर काही सामान नेता येत नाही. मोबाईल व इतर वैयक्तिक सामान ठेवण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे. तिथली एकूण भव्यता बघून आगोजागी स्थिरावून ती भव्यता मनात साठवण्याची तीव्र इच्छा व्हायची, पण मला आस लागली होती ती श्रीरामलल्लाच्या दर्शनाची, श्रीरामाचे ते मोहक स्मित हास्य करणारे बोलक्या डोळ्यांचे गोजिरे रूप पाहून जीवनात धन्यता काय असते ते त्याक्षणी मला समजले. नकळत माझे डोळे भरून आले, नतमस्तक होऊन तिथून हलूच नये असे मनात आले. पण पुढे तर जावेच लागेल, प्रसाद घेऊन मी बाहेर आलो खरा, पण श्रीरामाचे मोहक रूप माझ्या नजरेसमोरून जातच नव्हते. मी मागे येऊन पुन्हा रांगेत उभा राहिलो. असे सलग चार वेळा मी रांगेत राहून पुन्हा पुन्हा दर्शन घेतले.

नंतर हनुमानशीळा येथे जाऊन मारुतीरायाचेही दर्शन घेतले, मला इतकेच सांगावेसे वाटते की प्रत्येक भारतीयाने तो मग जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी त्याने एकदा तरी अयोध्येत आऊन श्रीरामलल्लाचे दर्शन अवश्य घ्यावे. मंदिराबाहेर बसलो असताना दोन तरुण आपल्या वृद्ध मातेला उचलून घेऊन दर्शनाला जाताना दिसले. त्यांनी थोडा वेळ तिला खाली बसवले, तेव्हा मी त्यांच्याजवळ जाऊन संवाद साधला. तेव्हा मला कळले की ते गुजराथहून आलेले होते. 'मला एकदा तरी श्रीरामलल्लाचे दर्शन करून आणा,' असा हट्ट त्या म्हाताऱ्या आईने धरल्यामुळे तिला अक्षरशः उचलून घेऊन ती दोन्ही मुले आली होती. यावरून रामभक्ती प्रत्येक भारतीयाच्या मनात किती खोलवर रुजली आहे, ते लक्षात आले.

गोव्यातील एका टी.व्ही. चॅनलच्या मित्राने मी तिथून फोन केला असता, मला फोटो व माहिती पाठविण्यास सांगितले, ते गोव्यात अनेकांनी पाहिल्यावर मला प्रसादासाठी फोन येऊ लागले, पण मी काही मूर्ती व थोडाच प्रसाद आणला होता, तो लगेच संपला. एका मित्राने मला फोन करून प्रसाद मागितला, पण माझ्याकडे शिल्लक नव्हता, तर तो गयावया करून म्हणाला, अयोध्येतील चिमूटभर माती आणली असली, तरी मला द्या. यावरून जनमनात किती खोलवर श्रीराम वसला आहे ते लक्षात येते.

मी आणलेल्या श्रीराम लक्ष्मण व सीता, हनुमान मूर्ती मी मुख्यमंत्री व भाजपाचे प्रदेश अध्यक्ष यांना भेट दिल्या, अनेक मित्रांचे फोन अजूनही येत आहेत. मी ३ रोजी पुन्हा कुटुंबासह अयोध्येला जाणार असून आल्यावर प्रसाद देईन, असे सांगत आहे. सरकारनेही गोमंतकीय रामभक्तांची अयोध्येला जाण्याची सोय करावी व जनतेचा आशीर्वाद घ्यावा.

 

Web Title: overwhelmed by the sight of ram lalla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.