कुळागर फुलवणाऱ्या गोव्याच्या शेतकऱ्याला पद्मश्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2024 09:01 IST2024-01-26T08:58:20+5:302024-01-26T09:01:00+5:30
फोंडा येथील ५८ वर्षीय कृतिशील शेतकरी संजय अनंत पाटील यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

कुळागर फुलवणाऱ्या गोव्याच्या शेतकऱ्याला पद्मश्री
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : 'वन-मॅन-आर्मी' म्हणून ओळख असलेले आणि नैसर्गिक शेती आणि शून्य-ऊर्जा सूक्ष्म सिंचन प्रणालीतील योगदानासाठी ओळखले जाणारे फोंडा येथील ५८ वर्षीय कृतिशील शेतकरी संजय अनंत पाटील यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
पाटील यांनी एकट्याने आयसीएआर, सीसीएआरआय, गोवा यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाने १० एकर नापीक जमिनीचे हिरव्यागार कुळागारात रूपांतर केले आहे. शिलवाडा सावईवेरे येथे त्यांनी आपल्या कुळागरात किलोमीटरपेक्षा जास्त लांब भुयारे मारून डोंगरावरून पाणी आणण्याची किमया केली आहे.
यंदा राष्ट्रपतींनी २ संयुक्त प्रकरणांसह १३२ पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. (दोन प्रकरणात, पुरस्कार एक म्हणून गणला जातो). या यादीत ५ पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि ११० पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांपैकी ३० महिला आहेत आणि या यादीमध्ये परदेशी एनआरआय (नॉन रेसिडण्ट इंडियन), पीआयओ (पर्सन विथ इंडियन ओसीआय ओरिजिन), (ओव्हरसिज सिटिझन ऑफ इंडिया) या श्रेणीतील ८ व्यक्ती आणि ९ मरणोत्तर पुरस्कारप्राप्त व्यक्तींचाही समावेश आहे.
मला मिळालेला सन्मान हा गोव्यातील सर्व शेतकरी बांधवांचा आहे. या पुरस्कारामुळे राज्यातील कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात प्रोत्सहन मिळेल. गेल्या ३५ वर्षांत केलेल्या श्रमाचे फळ आज मिळले. - संजय पाटील, पद्मश्री पुरस्कार विजेते शेतकरी