पणजीत पे-पार्किंगमुळे खिशाला कात्री
By admin | Published: April 20, 2016 01:46 AM2016-04-20T01:46:09+5:302016-04-20T01:51:36+5:30
पणजी : राजधानी पणजीतील नागरिक तसेच पणजीत येणारे वाहनधारक यांना पार्किंगसाठी भरमसाट शुल्कास सामोरे जावे
पणजी : राजधानी पणजीतील नागरिक तसेच पणजीत येणारे वाहनधारक यांना पार्किंगसाठी भरमसाट शुल्कास सामोरे जावे लागणार आहे. कार व जीपगाड्यांसाठी केवळ एका तासासाठी २० रुपये, तर दुचाकी वाहनांसाठी एका तासासाठी १० रुपये पार्किंग शुल्क लागू करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर बुधवारी येत आहे. तो संमत झाला, तर पणजीत वाहनधारकांचे पे-पार्किंगमुळे कंबरडेच मोडेल. एकूण ८00 टक्के शुल्कवाढ सुचविण्यात आली आहे.
पणजीतील एकूण अठरा प्रमुख मार्गांच्या कडेने वाहनांना पार्किंग शुल्क लागू करण्याचा प्रस्ताव आहे. त्याविषयी कुणाचा वाद नाही; पण यापूर्वी महापालिकेने जे शुल्क सुचविले होते, त्यात आठ पटीने वाढ करणारा सुधारित प्रस्ताव महापालिकेने पुढे आणला आहे. यामुळे विरोधी भाजप नगरसेवकांसह आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. यापूर्वी पे-पार्किंगसाठी दोनवेळा जी निविदा जारी करण्यात आली होती, त्यात सुचविलेली शुल्कवाढ आक्षेपार्ह नव्हती. मात्र, आता आठ पटीने अधिक वाढ सुचविली गेल्याने सत्ताधारी गटातीलही काही नगरसेवक अस्वस्थ बनले आहेत. पणजीत केवळ बाहेरूनच वाहने येतात असे नव्हे, तर पणजीतील नागरिकांनाही वारंवार शहरात फिरावे लागते. दिवसभर जर कुणी पणजीत दुचाकी पार्क केली, तर पन्नास रुपये त्यासाठीच खर्च करावे लागतील. सुधारित प्रस्तावानुसार, चारचाकी वाहनाकडून प्रथम २० रुपये आकारले जातील व नंतरच्या प्रत्येक तासासाठी आणखी १० रुपये पार्किंग शुल्क आकारले जाणार आहे.
सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांची मंगळवारी बैठक झाली. त्या वेळी भरमसाट शुल्कवाढ करायची नाही, असे मत काही नगरसेवकांनी मांडले. महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी हा प्रस्ताव ‘वरून’ आला असल्याचे त्यांना सांगितल्याची माहिती मिळाली आहे. पे-पार्किंगसाठी तिसऱ्यांदा निविदा जारी केली जाणार आहे.