भाजपकडून दक्षिण गोवा मतदारसंघासाठी पल्लवी धेंपो यांना उमेदवारी जाहीर 

By किशोर कुबल | Published: March 25, 2024 07:28 AM2024-03-25T07:28:45+5:302024-03-25T07:29:05+5:30

तिकिटासाठी  त्यांच्याच नावास भाजप श्रेष्ठी अखेरपर्यंत अनुकूल राहिले व अखेर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवारांच्या यादीत त्यांच्या नावाची घोषणा केली.

Pallavi Dhempo has been announced as candidate for South Goa constituency by BJP | भाजपकडून दक्षिण गोवा मतदारसंघासाठी पल्लवी धेंपो यांना उमेदवारी जाहीर 

भाजपकडून दक्षिण गोवा मतदारसंघासाठी पल्लवी धेंपो यांना उमेदवारी जाहीर 

पणजी : भाजपने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अखेर पल्लवी धेंपो यांना जाहीर केली आहे. धेंपो उद्योग समुहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांची पत्नी पल्लवी यांचे नाव आधीच निश्चित झाले होते.‘लोकमत’नेही या संबंधीचे वृत्त दिले होते. तिकिटासाठी  त्यांच्याच नावास भाजप श्रेष्ठी अखेरपर्यंत अनुकूल राहिले व अखेर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवारांच्या यादीत त्यांच्या नावाची घोषणा केली.

पल्लवी या पर्येंच्या आमदार दिव्या राणे यांच्या चुलत भगिनी होत. त्यांच्या रुपाने दक्षिण गोव्याला नवा चेहरा उमेदवार म्हणून मिळाला आहे. धेंपो कुटूंब भाजप समर्थक असून त्यांनी कायम भाजपला मदत केली आहे. आता अधिकृतरित्या तिकीट जाहीर झाल्याने पल्लवी भाजप कार्यालयास भेट दिली.

ही संधी मी अत्यंत नम्रपणे स्वीकारते -पल्लवी 
पल्लवी धेंपो दिल्लीहून अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर येथील भाजप कार्यालयात दाखल झाल्या. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री तथा उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी त्यांचे स्वागत केले.याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना पल्लवी म्हणाल्या की, 'भाजपने दिलेली ही संधी मी अत्यंत नम्रपणे स्वीकारते. मला उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच केडरमधील इतर सर्वांचे मी आभार मानते.पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची दूरदृष्टी व भाजपच्या तत्त्वांचा मी नेहमीच आदर करत आले आहे.' पत्रकारांनी त्यांना अचानक राजकारणाकडे कशा काय वळलात, तसे विचारले असता 'ही सुरुवात असल्याचे त्या म्हणाल्या. भाजपाची तत्वे मला भावली म्हणून मी या पक्षाची उमेदवारी स्वीकारली, असे त्यांनी सांगितले. तिकिटासाठी तुमचे नाव गेले अनेक दिवस चर्चेत होते. त्यामुळे प्रचाराच्या वगैरे काही योजना तुम्ही आखल्या आहेत का, अशा असे विचारले असता 'अद्याप प्रचार आराखडा तयार केलेला नाही.', असे त्यांनी सांगितले.

५० राजकीय राखीवता देऊन महिलांचा सन्मान केला- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्यात भाजपने गोव्यात महिलांचा सन्मान, महिलांना न्याय देताना ५० राजकीय राखीवता दिली. लोकसभेसाठी भाजपने प्रथमच महिला उमेदवार दिला. त्यामुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दक्षिण गोव्यात यावेळी महिला उमेदवार इतिहास करणार आहे.' मुख्यमंत्री म्हणाले की, धेंपो कुटुंबीयांचे समाजासाठी फार मोठे योगदान आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांचे भरीव कार्य आहे. प्राथमिक शाळा या उद्योग समूहाचे दत्तक घेतलेल्या आहेत. अडल्या- नडलेल्यांना या कुटुंबाने नेहमी साथ दिली आहे.'मुख्यमंत्री म्हणाले की, पल्लवी यांना सर्वांना  विश्वासात घेऊनच  उमेदवारी दिलेली आहे.
         
कवळेकर, सावईकर वगैरे पल्लवीसाठी काम करतील- तानावडे 
प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे  म्हणाले की, पल्लवी या पूर्वीपासून भाजपच्या सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना नव्याने पक्षात प्रवेश देण्याचा प्रश्नच नाही. दक्षिण गोव्यात भाजप कोणाला उमेदवारी देतो याबद्दल अनेकांना उत्कंठा होती. पल्लवी यांना अधिकृतरित्या तिकीट जाहीर झालेली आहे दक्षिणेतून तिकिटासाठी इच्छुक बाबू कवळेकर, नरेंद्र सावईकर वगैरे सर्वजण पल्लवी यांच्यासाठी काम करतील. बूथ स्तरापासून राज्य स्तरापर्यंत सर्वजण भाजप उमेदवाराच्या विजयासाठी झटतील.'

Web Title: Pallavi Dhempo has been announced as candidate for South Goa constituency by BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.