सांतिनेजचे 'ते' कब्रस्थान, मशीद नव्हेच - उदय मडकईकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 12:24 PM2020-04-23T12:24:51+5:302020-04-23T12:36:08+5:30
गोव्यामध्ये कब्रस्तानचा विषय बराच गाजत आहे. या अनुषंगाने महापौर मडकईकर यांच्याशी साधलेला संवाद...
पणजी - गोव्याच्या या राजधानी शहरात सध्या कब्रस्तानचा विषय बराच गाजत आहे. मुस्लिम बांधवांचे असे म्हणणे आहे की, या कब्रस्तानला टाळे ठोकून महापालिकेने मुस्लिमांच्या अंत्यसंस्काराला प्रतिबंध केला आहे तर महापौर उदय मडकईकर यांचा असा दावा आहे की, सांतिनेज येथे आहे ते कब्रस्तान, मशीन नव्हे!, त्यामुळे तेथे केवळ आणि केवळ अंत्यसंस्कार होतील. नमाज पठण करू देणार नाही आणि नमाज पढल्यास एफआयआर दाखल करू. या वादाच्या अनुषंगाने महापौर मडकईकर यांच्याशी साधलेला संवाद...
सांतिनेज येथील कबरस्थानला महापालिकेने टाळे ठोकून मुस्लिम बांधवांच्या अंत्यसंस्काराला प्रतिबंध केल्याचा आरोप होत आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचाही दावा केला जात आहे,यावर तुमचे म्हणणे काय?
उत्तर - मुळात सांतिनेज येथे आहे ते कबरस्तान, मशीद मुळीच नव्हे!, त्यामुळे याठिकाणी नमाज पठणास परवानगी देण्याचा प्रश्नच नाही. मानवी हक्कांचा कोणीही बाऊ करू नये. बाबनी शेख याची गुंडगिरीची पार्श्वभूमी तमाम गोवेकरांना माहीत आहे. याआधी या कब्रस्तानमध्ये कोणाला आणून दफन केले याची कल्पना कोणालाही नाही. लॉकडाऊन काळातही बाबनी शेख याने याठिकाणी दोनशे मुस्लिम बांधवांना आणून बेकायदा नमाज पठण केले. संचारबंदी व जनता कर्फ्यू असूनही बाबनी याने हे कृत्य केले. महापालिकेने कब्रस्तानला टाळे लावलेले असले तरी तेथे आमचा एक माणूस चोवीस तास उपलब्ध आहे. महापालिकेचा ना हरकत दाखला घेऊन महापालिका क्षेत्रातील कोणीही मुस्लिम बांधव या ठिकाणी अंत्यसंस्कार करू शकतो. त्यासाठी कोणालाही आम्ही रोखलेले नाही. नमाज पठण करू देणार नाही आणि आणि याचे जर का कोणी उल्लंघन केले तर पोलिसात एफआयआर नोंदविण्यासही मागेपुढे पाहणार नाही. महापालिका याबाबत ठाम आहे आणि तसा ठराव महापालिकेने घेतलेला आहे.
लॉकडाऊनच्या काळात धार्मिक स्थळांवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात आहेत की नाहीत, यावर महापालिका कशी देखरेख ठेवून आहे?
उत्तर - लॉकडाऊनचे नियम केवळ मुस्लिम बांधवांसाठी नव्हे तर हिंदू धर्मीय ख्रिस्ती अशा सर्व धर्मांसाठी लागू आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कोणत्याही धार्मिक स्थळांवर लोकांना जमा होण्यास निर्बंध आहेत . त्यामुळे धार्मिक कार्यक्रमही बंद आहेत. पणजीत भाटले, मळा, ताळगाव भागात मशिदी आहेत तेथेही मार्गदर्शक तत्त्वे पाळावी लागतील. आम्ही पणजीतील धार्मिक संघटनांची बैठक घेतली त्यावेळी मंदिरे,चर्चचे प्रतिनिधी आले, परंतु काही मशिदींचे प्रतिनिधी मात्र फिरकले नाहीत. हे असे का? याचे कोडे आम्हालाही पडले आहे. बाबनी शेख याची गुंडगिरीची कारकीर्द तमाम गोवेकरांना माहिती आहे. त्यामुळे त्याने कब्रस्तानच्या बाबतीत तरी कोणतेही राजकारण महापालिकेकडे करू नये. ते आम्ही खपवून घेणार नाही.
लॉकडाऊनच्या काळात मार्केट इमारत बंद ठेवून तुम्ही नुकसान करत आहात, अशी एक चर्चा आहे यावर तुमचे म्हणणे काय?
उत्तर - २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर लॉकडाऊन जाहीर होण्याआधी पणजी मार्केट सकाळी पाच तासांसाठी उघडे राहील, अशी घोषणा महापालिकेने केली. परंतु त्या दिवशी जी काही लोकांनी गर्दी केली आणि आम्ही अनुभवले ते पाहता सोशल डिस्टंसिंगचे तीन तेरा झाले. असे धाडस पुन्हा करता येणार नाही, हे आम्ही मनोमन ताडले. त्यामुळे महापालिका मार्केट इमारतीच्या सहाही गेटना मी टाळे ठोकले आहे आणि तेथे सुरक्षा रक्षक बसवले आहेत. लॉकडाऊन पूर्णपणे उठेपर्यंत हे टाळे खुले केले जाणार नाही. राजधानी पणजीवासियांना लॉकडाऊनची मार्गदर्शक तत्त्वे पाळावीच लागतील. याचे कारण कोरोनाचे आरोग्य संकट जगभरातील जनतेवर आहे. या व्हायरसबाबत कोणताही धोका पत्करता येणार नाही. पणजी आणि परिसरात बेकायदेशीररित्या फळे, भाजी विकणाऱ्यांवर मी कारवाई सुरू केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात पणजीतील नागरिकांना महापालिकेने मदतीचा हात कसा दिला, यावर थोडक्यात भाष्य कराल काय?
उत्तर - लॉकडाऊननंतर लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोचवणारी पणजी महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली. त्यानंतर राष्ट्रीय चॅनलनीही याची दखल घेतली आणि इतर महापालिकांनी याचा आदर्श घ्यावा असे सुचविले. पहिल्या दहा-बारा दिवसांच्या काळात महापालिकेने तब्बल ५ हजार लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा घरपोच पुरवठा केला. दररोज आम्ही रात्री जागवल्या. नगरसेवकांच्या माध्यमातून घरोघरी जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे काम केले. या कामात कुठेही खोट ठेवली नाही परंतु आता काही निर्बंध शिथिल झाल्याने महापालिकेने ही सेवा बंद केली आहे.
लॉकडाऊन काळात काही नियम शिथिल झाल्यानंतर बाजारात काही विक्रेते त्याचा गैरफायदा घेत आहेत, त्याबद्दल तुमचे मत काय?
उत्तर - होय. काही लोक गैरफायदा घेत आहेत, ही गोष्ट खरी आहे. भाटले, सांतिनेज येथे वाहनांमधून कलिंगडे तसेच अन्य फळे बेकायदेशीररित्या विकली जात होती. यावर आम्ही तातडीने पावले उचलून कारवाई केली. मार्केट परिसरात भाजीविक्री होत होती, तेथेही कारवाई केली. रेंट ए बाईक वाल्यांनी दुचाकी रस्त्यावर आणून अंदाधुंदी केली. त्यांच्यावरही महापालिकेने बडगा उगारण्याचा इशारा दिला. आरटीओला सांगून परमिट रद्द केले जातील. महापालिकेने तंबाखूजन्य पदार्थांबरोबरच च्युईंग गमवर बंदी आणलेली आहे. पान मसाला किंवा च्युईंग गम चघळून थुंकल्यास कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. यापुढे शहरात पान मसाला वगैरे चघळल्यासही कारवाई केली जाईल. पान मसाला चघळणारे तुरुंगात जाऊ शकतात तसेच विक्री करणाऱ्यांना खडी फोडण्यासाठी जाण्याची पाळी येऊ शकते.
लॉकडाऊनमुळे पावसाळापूर्व घर दुरुस्तीची कामे रखडली आहेत याबाबत तुमचे म्हणणे काय?
उत्तर - सरकारने आता काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे घर शाकारणी किंवा दुरुस्तीसाठी साध्या कागदावर अर्ज केल्यास महापालिका परवानगी देईल. त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. काही हॉटेलांनी व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मागितली होती. परंतु केवळ होम डिलिव्हरीसाठी महापालिका परवानगी देईल. कॅफे भोसले, कॅफे तातोसारख्या पणजीतील हॉटेलांनी परवानगी मागितली होती.