पणजी : पत्रादेवी-बांबोळी महामार्ग चौपदरीकरण, कामाचा येत्या तीन महिन्यात होणार प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 12:53 PM2017-10-15T12:53:20+5:302017-10-15T12:53:35+5:30
पत्रादेवी ते बांबोळी या ४२.९ कि.मी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे सुमारे २,२३७ कोटी रुपये खर्चाचे काम येत्या तीन महिन्यात सुरु होणार आहे.
पणजी : पत्रादेवी ते बांबोळी या ४२.९ कि.मी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे सुमारे २,२३७ कोटी रुपये खर्चाचे काम येत्या तीन महिन्यात सुरु होणार आहे. एम्. व्यंकट राव इन्फ्रा प्रा. लि, आणि नवयुग इंजिनीयरिंग कंपनीला त्यासाठीचे कंत्राट बहाल करण्यात येणार आहे. बांबोळी ते पोळे या दक्षिण गोव्यातील उर्वरित चौपदरीकरणाचे पॅकेज अद्याप निश्चित व्हायचे आहे.
पत्रादेवी ते बांबोळी चौपदरीकरणाचे काम पत्रादेवी ते करासवाडा आणि करासवाडा ते बांबोळी असे दोन टप्प्यात होणार आहे. पत्रादेवी ते करासवाडा महामार्गाचे काम कमी बोली लावल्याने एमव्हीआर कंपनीला तर करासवाडा ते बांबोळी महामार्गाचे काम नवयुग कंपनीकडे सोपविण्यात येणार आहे. दोन्ही कंपन्यांना लवकरच वर्क आॅर्डर दिली जाईल, असे बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांनी सांगितले. वर्क आॅर्डर बहाल केल्यानंतर प्रत्यक्ष काम तीन महिन्यात सुरु होईल आणि तीन वर्षात ते पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बांबोळी ते पोळे महामार्गाचे पॅकेज अजून निश्चित झालेले नाही.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाची पनवेल ते कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग १७ च्या चौपदरकरणाची ही योजना आहे. गोव्यात पत्रादेवी ते पोळे राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात जास्त घरे जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात आलेली आहे. पर्वरी येथे महामार्गाच्या दुतर्फा मोठी वस्ती असल्याने या भागात दोन ते तीन किलोमिटर लांबीचे इलेव्हेटेड स्ट्रक्चर येईल, असे पार्सेकर यांनी स्पष्ट केले.
या चौपदरीकरणानंतर गोव्यातील एका टोकापासून दुसºया टोकापर्यंतचा प्रवास अल्प वेळेत होणार आहे.