पणजी महानगरपालिकेला स्वच्छ शहराबद्दल पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 09:44 PM2019-12-19T21:44:12+5:302019-12-19T22:14:43+5:30
महापालिकेला प्रथमच स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाल्याचे महापौर मडकईकर यांनी सांगितले.
पणजी : स्वच्छ शहराबद्दल पणजी महापालिकेला ५0 हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र देऊन आज मुक्तिदिनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गौरविले. महापौर उदय मडकईकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर तसेच आयुक्त संजित रॉड्रिग्स उपस्थित होते.
महापालिकेला प्रथमच स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाल्याचे महापौर मडकईकर यांनी सांगितले. स्थानिक आमदार बाबूश मोन्सेरात, आयुक्त संजित तसेच मनपा कामगारांना याचे श्रेय त्यांनी दिले आहे. आपल्या कारकिर्दित हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
मडकईकर म्हणाले की, कचरा विल्हेवाटीला आम्ही प्राधान्य देत आहोत. शहरात ६ ठिकाणी बायो डायजेस्टर येणार आहेत. बायोमिथेनेशन पध्दतीने कचरा विल्हेवाट केली जाईल. काही व्यावसायिक आस्थापनांनी त्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. या आस्थापनांना निम्मा खर्च महापालिका देणार आहे. गास्पार डायस क्लबने ३00 किलो ओला कचरा क्षमतेचा बायो डायजेस्टर उभारण्याची तयारी दाखवली आहे.
शहरात पाच टनी मिनी कचरा प्रकल्प यावेत यासाठीही प्रयत्न चालू असल्याची माहिती मडकईकर यांनी दिली.