पणजी महापालिकेला क्रोएशियातील महानगर प्रशासनाचे मिळणार सहकार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 01:27 PM2019-12-13T13:27:15+5:302019-12-13T13:27:27+5:30
दिवंगत मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना 26 जुलै 2018 रोजी आपापसातील सहकार्याबद्दल समझोता करार झाला होता.
पणजी : क्रोएशिया देशातील दुब्रोवनिक शहर महापालिकेचे महापौर मातो फ्रांकोविक यांची गोव्यातून गेलेल्या शिष्टमंडळाने भेट घेऊन पणजी महापालिका आणि दुब्रोवनिक महापालिका यांच्यात कचरा विल्हेवाट तंत्रज्ञान तसेच अन्य विषयांवर तांत्रिकी देवाणघेवाणीवर चर्चा केली.
महापौर उदय मडकईकर, उपमहापौर पास्कोला मास्कारेन्हस,आयुक्त संजित रॉड्रिग्स व अधिकारी मिळून पाच जणांचे शिष्टमंडळ सध्या क्रोएशिया दौऱ्यावर आहे. दिवंगत मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना 26 जुलै 2018 रोजी आपापसातील सहकार्याबद्दल समझोता करार झाला होता. युरोपियन महासंघाकडून निधी मिळत असलेल्या आंतरराष्ट्रीय शहर सहकार उपक्रमांतर्गत देवाणघेवाणीचा हा करार आहे.
महापौर उदय मडकईकर म्हणाले की, राजधानी पणजी शहरासमोर घनकचरा व्यवस्थापनासंबंधी असलेली समस्या दूर करण्याबाबत दुब्रोवनिक शहराच्या सहकार्याने काय करता येईल, याचा आढावा घेतला. तेथील महापौरांकडे चर्चा फलदायी ठरलेली असून येणाऱ्या काळात पणजी महापालिकेसाठी ही भेट फार उपयुक्त ठरणार आहे. वेगवेगळ्या देशांमधील शहरे अशा पद्धतीने तांत्रिकी तसेच अन्य देवाणघेवाणीसाठी एकत्र येत आहेत ही चांगली बाब आहे.
आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनीही या हात मिळवणीबाबत समाधान व्यक्त केले आणि कचरा विल्हेवाट तंत्रज्ञानच नव्हे तर अन्य बाबतीतही हा परस्पर समझोता करार पणजी शहरासाठी फार मोलाचा ठरणार असल्याचे म्हटले आहे.