खुनी हल्ला प्रकरणातील फरार रॉनी डिसोझाला पणजी पोलिसांकडून अटक
By वासुदेव.पागी | Published: March 20, 2024 03:54 PM2024-03-20T15:54:47+5:302024-03-20T15:54:59+5:30
११ डिसेंबर २०२३ रोजी रात्री करंझाळे येथे सूर्यावर सुरे तलवारी घेऊन हल्ला केला होता.
पणजी : करंझाळे येथे सूर्या ऊर्फ सूर्यकांत कांबळे याच्यावरील डिसेंबरमध्ये झालेल्या खुनी हल्ला प्रकरणातील फरारी सूत्रधार रॉनी डिसोझा याला पणजी पोलिसांनी अटक केली. रॉनी आणि सूर्या हे दोन्हीही गुन्हेगारी पार्श्वभुमीचे असून त्यांच्याविरुद्द अनेक गुन्हेही नोंदविण्यात आले आहेत.
११ डिसेंबर २०२३ रोजी रात्री करंझाळे येथे सूर्यावर सुरे तलवारी घेऊन हल्ला केला होता. या हल्ल्यात सूर्या गंभीर जखमी झाला होता आणि त्यामुळे त्याला उपचारांसाठी गोमेकॉत दाखल करावे लागले होते. हा हल्ला करणारे हल्लेखोर तसे अल्पवयीन होते, परंतु या. प्रकरणाचा जसजसा तपास पुढे गेला तसतसे या प्रकरणातील एक एख धागेदोरे उघड होऊ लागले. रॉनीनेच या अल्पवयीन मुलांना हा हल्ला करण्यास प्रवृत्त केले होते असे तपासातून आढळून आले आहे. पोलीस आपल्या मागावर आहेत याची कुणकुण लागताच रॉनी गायब झाला होता आणि पोलिसांना गुंगारा देत फिरत होता. रॉनी पणजी शहरात असल्याची माहिती मिळताच पणजी पोलिसांनी त्वरित कारवाई करून त्याला अटक केली.
सूर्यावरील हल्ला हा दोघांमधील पूर्व वैमनस्यातून झाला होता. रॉनीच्या जवळच्या माणसांना सूर्याने मारल्याचा संशय रॉनीला होता. त्यामुळे सूडापोटी त्याने हा डाव रचला होता आणि त्यासाठी अल्पवयीन मुलांना हाताशी धरले होते असेही तपासातून आढळून आले आहे.
११ डिसेंबरच्या हल्ल्यात सूर्या हा पीडित ठरला असला तरी सूर्याही काही धुतल्या तांदळासारखा साफ नाही. पोलीसांच्या हिस्ट्रीशीटरांच्या यादीत सूर्याचे नाव सर्वात वर आहे. बेकायदा शस्त्रे बाळगणे, जिवे मारण्याची धमकी देणे, मारहाण करणे असे गुन्हे त्याच्या नावावर आहेत. एका पणजी पोलिसस्थानकातच त्याच्या विरुद्ध चार गुन्हे नोंद आहेत. या शिवाय पेडणे डिचोली, कळंगूट आणि साळगाव पोलीस स्थानकातही त्याच्या विरुद्ध गुन्हे नोंद आहेत.