पणजी पोलीस ठाणे हल्ला प्रकरण: गोव्याचे मंत्री बाबुश मोन्सेरात यांना तात्पुरता दिलासा, पत्नी जेनिफर यांच्या पदरी निराशा
By सूरज.नाईकपवार | Published: July 21, 2023 04:25 PM2023-07-21T16:25:54+5:302023-07-21T16:26:28+5:30
Babush Monserrat: गाेव्याची राजधानी पोलिस ठाणे हल्ला प्रकरणात राज्याचे महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांना तात्पुरता दिलासा मिळाला तर त्यांच्या पत्नी ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या पदरी मात्र सपशेल निराशा पडली
- सूरज नाईक पवार
मडगाव - गाेव्याची राजधानी पणजी पोलिस ठाणे हल्ला प्रकरणात राज्याचे महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांना तात्पुरता दिलासा मिळाला तर त्यांच्या पत्नी ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या पदरी मात्र सपशेल निराशा पडली. मोन्सेरात दांपत्यांनी या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्याची मुभा दयावी असा अर्ज न्यायालयात केला होता. आज शुक्रवारी या अर्जावर न्यायालयाने निवाडा देताना बाबुशला सुनावणीच्या वेळी गैरहजर राहण्यास तात्पुरती सवलत दिली तर जेनिफर यांचा अर्ज फेटाळून लावला. ३० सप्टेंबर पर्यंत या खटल्याच्या सुनावणीस आता बाबुशला अनुपस्थित राहण्याची मुभा मिळाली आहे.
दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष इर्शाद आगा यांच्या न्यायालयात हा खटल्याची सुनावणी चालू आहे. शुक्रवारी सुनावणीच्या वेळी बाबुश व जेनिफर या गैरहजर होत्या. संशयितांचे वकिल तसेच सीबीआयचे वकील निशाद एम. पी. हे उपस्थित होते. तसेच पोलीस उपअधिक्षक सुदेश नाईक हेही न्यायालयात हजर होते. पुढील सुनावणी आता पुढच्या शुक्रवारी दि. २८ जुलै रोजी होणार आहे.
मागच्या सुनावणीच्या वेळी या हल्ल्यात वापरलेल्या तीन वाहने कुठे आहेत याची विचारणा न्यायालयाने केली होती. या तीन वाहनापैकी एका वाहनाचा मालक कालच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर हाेता. आपले वाहन सदया नादुरुस्त असल्याचे त्याने न्यायालयात सांगितले. हे वाहन आणण्यासाठी सरकारपक्षाने व्यवस्था करावी असे न्यायालयाने बजाविले तर अन्य दोन वाहन मालकांना कारणे दाखवा नोटीस बजवावीत व त्यांना पुढच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर करावे असेही सांगण्यात आले. २००८ साली पणजी पोलिस ठाण्यावर हल्ला प्रकरण घडले होते. यात ३७ संशयित असून, त्यातील एकाचे निधन झाले आहे