खाण अवलंबितांची उद्या पणजी पोलिस स्थानकावर धडक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 09:20 PM2018-04-01T21:20:48+5:302018-04-01T21:20:48+5:30

खाण अवलंबित ट्रकमालक सोमवारी येथील पोलिस स्थानकावर धडक देणार आहेत. धारबांदोडा येथे झालेल्या बैठकीत तसे आवाहन सर्वांना करण्यात आले आहे.

Panaji police station on Monday molestation | खाण अवलंबितांची उद्या पणजी पोलिस स्थानकावर धडक 

खाण अवलंबितांची उद्या पणजी पोलिस स्थानकावर धडक 

Next

पणजी : खाण अवलंबित ट्रकमालक सोमवारी येथील पोलिस स्थानकावर धडक देणार आहेत. धारबांदोडा येथे झालेल्या बैठकीत तसे आवाहन सर्वांना करण्यात आले आहे. गेल्या १९ रोजी आंदोलनात सहभागी झालेल्यांना समन्स बजावण्याचे सत्र पोलिसांनी आरंभल्याने निषेधार्थ खाण अवलंबित  दुपारी ४ वाजता शहर पोलिस स्थानकाजवळ जमणार आहेत. 

अखिल गोवा ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ गांवस यांनी या प्रतिनिधीशी बोलताना पोलिसांकडून छळवाद चालला असल्याचा आरोप केला. आंदोलनाला दहा-बारा दिवस उलटून गेले असले तरी अजूनही समन्स काढले जात आहेत. शनिवारीही आठजणांना समन्स देण्यात आले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी गोव्यात आले होते तेव्हा पोलिस यापुढे आंदोलकांना त्रास देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. परंतु असे असले तरी पोलिसांना एकेकाला शोधून काढून समन्स देणे चालू ठेवले आहे. आमदार, मंत्र्यांच्या मर्जीतील व्यक्ती असेल तर त्याला समन्स पाठवले जात नाही, असा आरोप करताना ही लोकशाही नव्हे तर हुकूमशाही असल्याचा आरोप गांवस यांनी केला. 

गावस पुढे म्हणाले की, १९ च्या आंदोलनानंतर राजधानी शहरवासीय तसेच आजुबाजुच्या परिसरातील लोकांची तसेच किनारपट्टीवासीयांची सहानुभूती अवलंबितांनी गमावल्याचे बोलले जाते. परंतु लोकांची खाण अवलंबितांना कालही सहानुभूती नव्हती, आजही नाही आणि उद्याही नसेल. 

 अशी आहे पार्श्वभूमी

राजधानी शहरात १९ रोजी केलेल्या या आंदोलनात खाण अवलंबितांनी  अक्षरश: झुंडशाही करीत सोमवारी दोन्ही मांडवी पूल रोखून जनतेला तब्बल पावणेचार तास वेठीस धरले होते. दुचाकीस्वारांना धाकदपटशा दाखवून पाच वाहनांची नासधूस तसेच पोलिसांवर दगडफेक केली होती त्यात ५ पोलिस जखमी झाले होते. राजधानी शहराच्या प्रवेशव्दारावर कोंडी करण्यात आल्याने अनेक वाहने यात अडकली तसेच विद्यार्थ्यांचीही परवड झाली होती. मंत्र्यांनी विनंती करुनही रस्ता मोकळा करण्यास आंदोलक तयार नव्हते. या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने अखेर पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला होता. यात ३ आंदोलक  जखमी झाले होते. सार्वजनिक मालमत्तेची हानी केल्या प्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली होती. 

Web Title: Panaji police station on Monday molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.