सरकारकडून कोंडी, आमदार गावकर यांचा महामंडळास रामराम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 07:33 PM2018-09-25T19:33:54+5:302018-09-25T19:34:22+5:30
सरकारने गेले चौदा महिने नव्या योजना राबविण्यास सहकार्य केले नाही. महामंडळासाठी निधी व अधिकारी वर्गही पुरविला नाही असे सांगत सांगे मतदारसंघाचे आमदार प्रसाद गावकर यांनी मंगळवारी सरकारी वन विकास महामंडळाच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला.
पणजी : सरकारने गेले चौदा महिने नव्या योजना राबविण्यास सहकार्य केले नाही. महामंडळासाठी निधी व अधिकारी वर्गही पुरविला नाही असे सांगत सांगे मतदारसंघाचे आमदार प्रसाद गावकर यांनी मंगळवारी सरकारी वन विकास महामंडळाच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला. प्रशासन ठप्प झालेले आहे, अशीही टीका गावकर यांनी केली.
गावकर हे नाराज असल्याचा अंदाज सर्वानाच आला होता. गावकर हे सोमवारी राजभवनवर भाजपाच्या नव्या मंत्र्यांच्या शपथविधीलाही उपस्थित राहिले नव्हते. गावकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषद घेतली व आपण चौदा महिन्यानंतर आता महामंडळाच्या चेअरमनपचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. हे महामंडळ म्हणजे सरकारला कचरा पेटी वाटते. चार महिने महामंडळासाठी व्यवस्थापकीय संचालक सरकारने दिले नव्हते. आता अतिरिक्त ताबा असलेला अधिकारी दिला आहे. आपण काजू विकास व काजू बागायत पुनरुज्जीवनाची योजना सरकारकडे पाठवली होती. तिनवेळा सरकारने ती योजना फेटाळून लावली असे गावकर यांनी सांगितले.
वन खाते हे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे आहे असे नमूद करून गावकर म्हणाले की, सरकारकडून मला सहकार्य लाभत नसल्याने या पदावर राहण्यात अर्थ नाही. माझा सरकारला पाठींबा आहे, पण यापुढे जास्त विचार करावा लागेल. मला सांगेतील लोकांशी बोलावे लागेल. दरवेळी सांगेच्या आमदाराला फक्त सरकार स्थापन करण्यासाठी जवळ घेतले जाते. मग सांगेची उपेक्षा केली जाते. मला दिलेल्या वन विकास महामंडळाला सरकारने निधी देखील दिला नाही.
हा उपाय कायमस्वरुपी नव्हे...
मी सहा आमदारांच्या जी-सहा गटात सहभागी झालो होतो. आम्हा सहाहीजणांचा समान असा हेतू होता. सरकारबाबत कायमस्वरुपी तोडगा हवा अशी मागणी आम्ही भाजपाच्या निरीक्षकांसमोर ठेवली होती. सोमवारी मंत्रिमंडळात जे बदल झाले आहेत, तो कायमस्वरुपी तोडगा असे मला वाटत नाही, असे गावकर म्हणाले. मला सरकारने योग्य ते स्थान द्यायला हवे, कारण मी पर्रीकर सरकारला पाठींबा दिलेला आहे, असे पाचही आमदारांनी भाजप निरीक्षकांना सांगितले होते, असे गावकर म्हणाले.
लोक खूप अस्वस्थ...
सांगेच्या खाणपट्टय़ातील लोक खूप अस्वस्थ आहेत. प्रशासन ठप्प झालेय. खाणी सुरू होत नाहीत. त्यामुळे लोक अडचणीत आहेत व आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्हाला लोक खूप प्रश्न विचारतात. तुम्ही वन विकास महामंडळावर राहून काय केले असे लोकांनी मला यापुढे विचारायला नको म्हणून मी राजीनामा देतोय. कारण काही करण्यासाठी मला सरकारचा पाठींबाच मिळत नाही, असे गावकर म्हणाले.