पंचायत सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वेतनात 50 टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 02:31 PM2018-09-26T14:31:36+5:302018-09-26T14:31:48+5:30
माविन गुदिन्हो : डिसेंबरमध्ये पंचायत विभागाचे पाटो-पणजीत ‘गृहप्रवेश’
पणजी : जागेअभावी पंचायत विभागाची कुंचबणा होत आहे. कामागारांनाही चांगली सुविधा देण्यासाठी हे विभाग नव्या जागेत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत पाटो-पणजी येथील ‘माईल्स हाय’च्या कॉम्पलेक्समध्ये पंचायत विभागाचे गृहप्रवेश होईल. येणा-या काळात पंचायत विभागाच्या स्वतंत्र दक्षता व तांत्रिक विभागाची स्थापना केली जाईल. कार्यात्मक स्वायत्त सेवा देण्यासाठी हे पाऊल आहे. तसेच पंचायत सरपंच, उपसरपंच, जिल्हा पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांच्या वेतनात ५० टक्के वाढ केली असून येत्या आठवड्यात होणा-या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याला मंजुरीही मिळेल, अशी माहिती पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.
बुधवारी सकाळी गुदिन्हो यांनी पत्रकारांसोबत या नवीन वास्तूची पाहणी केली. या वेळी ते बोलत होते. या कॉम्पलेक्सच्या तिस-या, चौथ्या, पाचव्या व सहाव्या मजल्यावर प्रत्येका एक जागा घेतली आहे. या चारही दालनांची एकत्र भाडे महिना ९ लाख असेल, अशी माहिती गुदिन्हो यांनी दिली. माविन म्हणाले की, पंचायत मंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अनेक बदल पंचायत खात्यात झाले आहेत. १४ व्या वित्त आयोगअंतर्गत पंचायत विभागाला चांगली निधी मिळतो. याचा योग्य विनीयोग करून राज्यातील पूर्ण १९१ पंचायतींना साधनसुविधा पुरविण्यासाठी पाऊल उचलले आहे. पूर्वी १३ व्या वित्त आयोगअंतर्गत या निधीचा वापर केला जात नव्हता. पूर्वी पंचायत घराच्या बांधकामासाठी २ कोटी निधी भेटायचा. यात वाढ करून तो ३.४० कोटी केला आहे. पंचायत घराच्या देखभालसाठी ही रक्कम वाढविली आहे. जो नवीन तांत्रिक विभाग उभारला जाईल, तो अंदाजित खर्चाची माहिती देईल व येणा-या प्रस्तावावर विचारविनिमय होईल.
स्मार्ट गावाची संकल्पना
माविन म्हणाले, स्मार्ट गावाची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात मूलभूत आवश्यकतेवर भर देऊन गावाचे सौंदर्यीकरण, पाणीसाठा असलेले तळे, विहिरींची साफसफाई केली जाईल. यातून गावाला नवीन झळाली देण्याचा प्रयत्न असेल. आता पंचायत विभागात नवीन भरतीप्रक्रिया केली जाणार आहे. २ कार्यकारी अभियंता, ८ सहायक अभियंता, ४० कनिष्ठ अभियंतांची नेमणूक केली जाणार आहे. कचरा संकलन रक्कममध्ये वाढ केली आहे.