पॅनकार्ड क्लबचे गोव्यातील कार्यालय गायब, कार्यालय स्थलांतर झाल्याचा कांगावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 09:06 PM2017-12-14T21:06:02+5:302017-12-14T21:07:56+5:30
पणजी : आलिशान हॉटेल, रिसॉर्टचे प्रलोभन दाखवून सामान्यांच्या पैसे लुटणा-या पॅनकार्ड क्लबचे गौडबंगाल पुढे आले आहे.
- विलास ओहाळ
पणजी : आलिशान हॉटेल, रिसॉर्टचे प्रलोभन दाखवून सामान्यांच्या पैसे लुटणा-या पॅनकार्ड क्लबचे गौडबंगाल पुढे आले आहे. सात हजार 35 कोटी रुपयांचा घोटाळा असलेल्या या पॅनकार्ड क्लबचे गोव्यातील राजधानीतील कार्यालय चार-पाच महिन्यांपूर्वीच बंद झालेल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, या कार्यालयाला कारवाईची कुणकुण लागल्यानेच येथून पलायन केले असावे, असा अंदाज आहे.
मुंबई शेअर बाजारात प्रविष्ट असलेल्या पॅनारॉमिक समूहाची उपकंपनी असलेल्या पॅनकार्ड क्लबमध्ये देशभरातील 50 लाख गुंतवणूकदारांचा पैसा त्यात गुंतलेला आहे. या कंपनीच्या मुसक्या मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) आवळत सहा संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे सात हजार 35 कोटी रुपयांचा घोटाळा पुढे आला आहे. देशभरातील प्रमुख शहरांतून मोठ-मोठय़ा उद्योजक, अधिकारी वर्गाला या क्लबने आपले सावज बनविले आहे. गोव्यातही अनेक मासे या क्लबच्या गळाला लागले असणार आहेत.
गोव्यातील किती गुंतवणूकदारांनी आपला पैसा या क्लबमध्ये गुंतविलेला आहे, हे अद्याप कळाले नाही. संकेतस्थळावर गोव्यातील पणजीमध्ये पॅनकार्ड क्लबचे 18 जून रस्त्यावरील सपना रेजन्सीमध्ये बॅरोन शोरूमच्या वर, बी-4, दुसरा मजल्यावर हे कार्यालय असल्याचा पत्ता आहे. या कार्यालयाचा लोकमतने शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ते कार्यालय काही मिळाले नाही. आजूबाजूच्या कार्यालयातून माहिती घेतल्यानंतर क्लबचे कार्यालय पाच-सहा महिन्यांपूर्वी येथून दुसरीकडे स्थलांतर झाल्याचे सांगण्यात आले.
सपना रेजन्सीमधील खासगी कार्यालयातील एका महिला कर्मचा-याने ते कार्यालय धेंपा हाऊसमध्ये स्थलांतर झाल्याचे सांगितले. बांदोडकर मार्गाशेजारील मार्केट परिसरातील धेंपो हाऊसमध्ये हे कार्यालय स्थलांतरित झाले आहे का? हे पाहण्यात आले. तेथेही असे काही कार्यालय आले नसल्याची खात्री झाल्यानंतर पाटो येथील धेंपो टॉवर्समध्ये हे कार्यालय स्थलांतर झाले असावे का, याचीही खात्री करण्यात आली. मात्र, तेथेसुद्धा हे कार्यालय स्थलांतरित झाले नसल्याचे समोर आले.
संकेतस्थळावर पॅनकार्ड क्लबचे कार्यालय सुरू होण्याची वेळ 9.30 ते सायंकाळी 6 अशी वेळ अशी देण्यात आली आहे. त्याचबरोबर याशिवाय 0832-2231173 किंवा 2231174 असा दूरध्वनी क्रमांक दिला आहे, त्यावर संपर्क साधल्यानंतर कृपया आपला नंबर तपासून पहा असे दूरध्वनीवर किंवा मोबाईलवर सांगण्यात येते. गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याने मुंबईत लवकरच ईओडब्ल्यू कारवाई करणार याची कल्पना आल्याने येथील कार्यालयानेही राजधानीतून पळ काढला असावा, असा अंदाज आहे.