राया कोरगावकर यांना पंडित जितेंद्र अभिषेकी पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2024 04:01 PM2024-09-05T16:01:54+5:302024-09-05T16:03:01+5:30
यंदा २८ व २९ सप्टेंबर रोजी संगीत महोत्सव.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : येथील कला अकादमीत भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील महान तपस्वी आणि गोमंतकीय सुपुत्र पंडित जितेंद्र अभिषेकी यांना आदरांजली म्हणून आयोजित केलेला यंदाचा संगीत महोत्सव २८ व २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. तर जितेंद्र अभिषेकी यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार यंदा ज्येष्ठ हार्मोनियम वादक राया कोरगावकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी शौनक अभिषेकी उपस्थित होते. गावडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. मंत्री गावडे म्हणाले की, 'अभिषेकी हे अभिजात भारतीय संगीताचे साधक होते. शास्त्रीय संगीतात त्यांनी स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. १९६० च्या दशकात मराठी संगीत रंगभूमीच्या पुनरुज्जीवनाचे श्रेयही त्यांना जाते. त्यांच्या नावे आयोजित केल्या जाणाऱ्या संगीत महोत्सवाचे हे १८ वे वर्ष आहे. तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, कला आणि संस्कृती संचालनालय, कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने महोत्सव होईल.
सकाळी ९:३० ते रात्री ९:३० या वेळेत महोत्सवातील विविध कार्यक्रम होतील. एकूण १५ कलाकार सहभागी होणार आहेत. कलाकारांमध्ये विदुषी डॉ. अश्विनी भिडे देशपांडे (गायन), पं. साजन आणि स्वरांश मिश्रा (गायन), पं. राजा काळे (गायन), पं. रघुनंदन पणशीकर (गायन), पं. पूरबायन चटर्जी (सितार), विदुषी शमा भाटे (कथक नृत्य), राजस उपाध्ये (व्हायोलिन), मकरंद हिंगणे (गायन), एस आकाश (बासरी), सुधाकर चव्हाण (गायन), धनंजय जोशी (गायन), जुई धायगुडे (गायन), राज शहा (गायन), सिद्धी सुर्लकर (गायन) व विना मोपकर (गायन) यांच्या कलांचे सादरीकरण होईल.